महादेवी हत्तीसाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, काल कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि मठातील स्वामींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये हत्तीला परत आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला. दुसरीकडे, आज वनतारा प्रशासनातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी वनतारा नांदणी येथे मठाजवळ पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करणार असल्याची माहिती दिली. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबुकवर पोस्ट करुन हत्तीला कायद्याच्या कचाट्यात अकडवू नका अशी मागणी केली.
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
"महादेवी उर्फ माधुरी हत्ती वनताराकडे सुपुर्द करण्यात यावा असे HPC (हाय पॅावर कमिटीने )आदेश दिल्यामुळेच माधुरी हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आली आहे.राज्य सरकार व वनतारा यांनी माधुरी हत्ती परत पाठविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल स्वागत. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत वेळकाढूपणा करून जनसामान्यांच्या भावना दुखावून तीव्रता वाढत आहेत, असंही राजू शेट्टी म्हणाले.
"मुळातच माधुरी हत्ती ही तंदुरूस्त असल्यामुळेच सलग ४८ प्रवास करून जामनगर वनतारा येथे पोहचली आहे.यामुळे तिच्यावर फार काही उपचार करणे गरजचे आहे असे वाटत नाही. तरीसुध्दा ती अधिक सदृढ व्हावे असे वनताराच्या तज्ञाना वाटत असेल तर त्यांनी माधुरीला नांदणी मध्ये आणून आमच्या डोळ्यांसमोर उपचार करावेत.आम्ही त्यांना पुर्ण सहकार्य करू. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेगवेगळे विकल्प तयार होवून पुन्हा वेगळे वळण लागते.
ज्यापध्दतीने बेकायदेशीरपणे अहवाल तयार करून माधुरी हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आली. त्यापध्दतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मा. महामहिम राष्ट्रपती यांना विनंती करून लाखो लोकांच्या अस्मिता असलेल्या माधुरी हत्तीस तातडीने नांदणी मठाच्या स्वाधीन करण्यात यावे. वनताराने माधुरी हत्तीवर जे उपचार करायचे आहेत ते नांदणी येथे येवून करावे आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही तोपर्यंत माधुरीला परत आणण्याचा हा लढा असाच सुरू राहील, असंही माजी खासदार शेट्टी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
आज वनतारा व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महादेवी हत्तीणीला परत पाठवण्यासाठी जी याचिका राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहेत त्यात सहभागी होण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.
या बैठकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता असं त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.