कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे घरातील लहान मुलांची काळजी घेणे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे. थोडेसे दुर्लक्ष कोरोनाला आमंत्रण देणारे ठरू शकते. म्हणूनच मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळण्यासह त्यांची विशेष काळजी घेणे फारच महत्त्वाचे आहे.
चौदा वर्षांपर्यंतची लहान मुले एका जागी बसत नाहीत. खेळाच्या निमित्ताने बाहेर असतात. त्यांचा कोणाशी संपर्क येतो समजत नाही. साबणाने हात धुतील, मास्क लावतीलच असे नाही. त्यामुळे यापुढील काळात धोका ओळखून त्यांची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
-लहान मुलांतील कोरोनाची लक्षणे काय?
सर्वसाधारण ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची लक्षणे असून, ती लहान मुलांमध्येही आढळून येतात. आई, वडील यांना ही लक्षणे असली की संसर्गाने ती त्यांच्या मुलांमध्येही आढळून येतात. गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेत हे दिसून आले. परंतु, आता गृह अलगीकरणात अनेक जण राहिले असल्यामुळे मुलांमधील लक्षणे तसेच त्यांचा निश्चित आकडा समजून येत नाही.
- मुलांची कशी काळजी घ्यावी -
कोरोना संसर्गाच्या काळात मुलांनी गर्दीत जाण्याचे टाळावे. आई - वडिलांनी ती काळजी घेतली पाहिजे. संसर्ग असल्यामुळे मुलांना जंक फुड देणे टाळावे. सकस अन्न द्यावे. मोकळ्या मैदानावर खेळू द्यावे. नियमित व्यायाम झाल्यावर तेवढीच विश्रांती द्यावी. काही लक्षणे आढळली की लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू करता येतात हे लक्षात ठेवावे. लस घेईपर्यंत काळजी घ्यायला पाहिजे.
-जिल्ह्यातील रुग्ण संख्या अशी-
१. एक वर्षाच्या आतील मुले - १३९
२. एक ते दहा वर्षांपर्यंतची मुले - ३२०२
३. अकरा ते वीस वर्षांच्या आतील मुले - ६५५१
४. जानेवारी २०२१ पासून १ ते २० वयोगटातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
- डॉक्टर्स प्रतिक्रिया -
१. ज्या मुलांना याआधी कोविड झाला होता, त्यांच्या अँटिबॉडीज पॉझिटिव्ह येऊ शकतात. त्यामुळे नवीन बाल कोविड रुग्णांबरोबरच कोविड पश्चात गुंतागुंतीचे आजार वाढल्याने काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेण्याकरिता येण्याची शक्यता आहे. म्हणूनच अशा रुग्णांसाठी यंत्रणा सज्ज ठेवणे परिणामकारक ठरणार आहे.
डॉ. सुधीर सरोदे,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
२. लहान मुले मास्क लावत नाहीत. सामाजिक अंतरही पाळत नाहीत. तोंडाला हात लावेल म्हणून सॅनिटायझरही लावले जात नाही. अशा परिस्थितीत लहान मुलांमधील कोरोचा संसर्ग रोखणे मोठे आव्हान आहे. म्हणूनच शक्यतो मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे पालकांनी टाळले पाहिजे. सर्दी, खोकला, उलट्या असे आजार जास्त दिवस राहिले तर लगेच कोरोना चाचणी करून घ्या.
डॉ. मोहन पाटील,
बालरोग तज्ज्ञ
- अशी सुरू आहे पूर्वतयारी -
भविष्यात बाल कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले असून, सीपीआर रुग्णालयात ५० बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू केला जाणार आहेत. जिल्ह्यातील लहान मुलांची संख्या, संभावित कोविड रुग्ण यांच्या सरासरीवर बेडची संख्या अवलंबून असणार आहे. महानगरपालिकाही ५० बेडचे एक स्वतंत्र रुग्णालय सुरू करणार आहे. राज्य सरकारकडून अद्याप उपचार, औषधे यासंबंधीचा प्रोटोकॉल आलेला नाही. त्यामुळे तयारीही प्राथमिक स्तरावर आहे.