कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्याचे प्रकार रोखून पारदर्शक व जलद कामकाज पद्धती सुरू करण्यासाठी विभागाची चार कार्यालयांत पुनर्रचना करण्याचे काम आयुक्त पी. शिवशंकर यांंनी हाती घेतले आहे. सध्या ई व ए, बी व सी अशी दोन कार्यालये आता चार कार्यालयांत विभागली जाणार आहेत. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी नेमणुकीसह कार्यालयासाठी जागा निवडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.बागल चौकातील एका मिळकतधारकास आठ लाख रुपये दंडाची रक्कम माफ करण्याच्या प्रकारावरून घरफाळा विभागातील घोटाळ्यांची मालिका पुढे आली. त्यानंतर केलेल्या तपासणीत २०१४-१५च्या आर्थिक वर्षातील वसुली तपासणीच्या पाहणीत तब्बल १३२७ मिळकतधारकांवर अडीच कोटी रुपयांची सूट देत कृपादृष्टी केल्याचा प्रकार घडल्याचे तपासणीत पुढे आला. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी घरफाळा विभागाची झाडझडती सुरू केली. या सर्व मिळकतधारकांकडून ही सूट दिलेली दंडाची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. घरफाळा विभागातील घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्याचबरोबर झालेल्या चुका भविष्यात होऊ नयेत याचीही व्यवस्था केली जात आहे. कर्मचाऱ्यांना थेट कच्च्या पावतीच्या आधारे पैसे स्वीकारण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच सर्व पावत्यांचे बारकोडिंग करणे सुरू आहे. अद्याप बड्या मिळकतधारकांच्या दीड हजार पावत्यांचे बारकोडिंग शिल्लक आहे. त्यानंतर एका क्लिकवर घरफाळा विभागातील सर्व माहिती आयुक्तांना पाहणे सोपे जाणार आहे. घरफाळा विभाग शहरातील गांधी मैदान, ताराराणी, राजारामपुरी व शिवाजी मार्केट येथील विभागीय कार्यालयात विभागला जाणार आहे. चार विभागांतून घरफाळा विभागाचे कामकाज चालणार आहे. यासाठी आवश्यक कार्यालयीन उपकरणे व कर्मचारी नेमणुकीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे घरफाळा विभाग कात टाकणार असला तरी मागील चुका व घोटाळेही यानिमित्त बाहेर पडणार असल्याने घोटाळेबाजांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)साधी राहणीघरफाळा विभाग सध्या नगरसेवकांसह आयुक्तांच्या रडारवर आहे. विभागातील बारीकसारीक घडामोडी व हालचालींची माहिती घेतली जात आहे. यापूर्वी घरफाळा विभागातील क र्मचारी व अधिकारी कडक इस्त्रीसह सुटाबुटात वावरताना दिसत होते. मात्र, घोटाळ्याची मालिका पुढे येईल, तसे अधिकारी व कर्मचारी अगदी जुने व साध्या कपड्यात वावरताना दिसत आहेत. ४घोटाळ्यात आपले नाव येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील सेवाभाव व नम्रता ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांत झालेल्या बदलांची नगरसेवकांसह महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
घरफाळा विभागाची चार कार्यालयांत विभागणी
By admin | Updated: June 1, 2015 00:13 IST