राजाराम लोंढे - कोल्हापूर -जिल्हा बँकेत व्यवहार करणे म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. प्रत्येक शाखेत दोन-दोन लाईन आहेत, तरीही सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांना दिवसभर ताटकळत बँकेतच बसावे लागते. बँकिंग क्षेत्र झपाट्याने बदलत आहे, खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले व्यवहार अधिक गतीमान केल्याने त्यागतीने सहकारी बँकांना जावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेनेही मार्च २०१३ मध्ये कोअर बँकिंग पूर्ण केले. या बॅँकिंग सुविधेमुळे सर्व शाखा एकत्रित बांधल्या जातात, पण सोयीची यंत्रणा गैरसोयीची ठरत असल्याचे चित्र सध्या जिल्हा बँकेच्या अनेक शाखांमधून पाहावयास मिळते. बँकेत सॅटेलाईट, रिलायन्स व बीएसएनएलच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित आहे. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून १९१ शाखेत कोअर बँकिंग पूर्ण केले असून त्याचे नियंत्रण पुण्यातून होते. रेंजची अडचण असल्याने प्रत्येक शाखेत दोन-दोन कंपनीच्या लाईन आहेत तरीही अनेकवेळा सर्व्हर डाऊन होतो आणि यंत्रणा कोलमडते. सर्व्हर डाऊन झाली की दोन-तीन तास कामकाज ठप्प होते. अनेक शाखांत दिवसभर सर्व्हरच येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पाच-सहा किलोमीटर लांब असणाऱ्या दुसऱ्या शाखेत जाऊन कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. ग्राहकांचे चेक, पैशांच्या स्लीप त्या शाखेत जाऊन वटवून नंतर त्यांना पैसे द्यावे लागतात. त्यामध्ये ग्राहकांचा अखंड दिवस बँकेतच जातो. दवाखान्यात पैसे भागवून पेशंटला घरी आणायचे असते, लग्नाची खरेदी करायची असते, अशा कारणांसाठी ग्राहक बॅँकेत आलेला असतो पण पैसे न मिळाल्याने त्याला नाहक त्रास होतो. त्यामुळे जिल्हा बँकेत व्यवहार करणे म्हणजे ग्राहकांच्या दृष्टीने एकप्रकारची शिक्षाच झाल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांमधून व्यक्त होत आहेत. आज, दुपारी शाहूपुरी येथील शाखेत सर्व्हर डाऊन झाल्याने मुख्य कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना व्यवहार करावे लागले.ग्राहक-कर्मचाऱ्यांमध्ये वाद बँकेच्या शाखांमध्ये अनेकवेळा सर्व्हर डाऊनमुळे ग्राहकांना त्रास होतो. तीन -चार तास बॅँकेत थांबावे लागत असल्याने सर्व कामांचे नियोजन कोलमडते. त्यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. याकडे बँक प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे - शिवाजी पाटील, ग्राहक, केर्लेवातावरणामुळे काहीवेळा अशाप्रकारची सर्व्हर डाऊनची अडचण येते, पण तातडीने संबंधित कंपनीशी संपर्क साधून सेवा सुरळीत केली जाते. तत्पर सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो.- डॉ. ए. बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा बॅँकेची ‘लाईन’ बिघडली
By admin | Updated: January 22, 2015 00:20 IST