कोल्हापूर : शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने वाटपाचा देशातील पहिलाच उपक्रम राबवणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने त्याही पुढे जाऊन आता शेतकऱ्यांचा समूह विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तरी लाभ देणाऱ्या या योजनेची टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु होईल, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.
जिल्हा बॅंकेचा ताळेबंद अंतिम झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुश्रीफ यांनी पत्रकार बैठक घेऊन बॅंकेच्या प्रगतीचा गोषवारा सांगितला. ते म्हणाले, देशात कुठेही नसतील इतक्या सवलती जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना दिल्या आहेत, आता सर्वच प्रकारच्या कर्जावर अर्धा ते एक टक्का व्याजाची कपात होणार आहे. शेतकऱ्यांना २०८ टक्के इतके पीक कर्ज देण्याची सर्वोच्च कामगिरी ही केली आहे. शंभर टक्के पीक कर्ज उचल करुन ते नियमित परतफेड करुन शिल्लक राहिलेली ऊस बिलाची रक्कम बॅंकेकडे बचत म्हणून ठेवतील त्यांना कर्जाच्या व्याज दरात एक टक्का सवलत दिली जाणार आहे.
चौकट ०१
कोरोनात ही १४७ कोटींचा नफा
चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे आणि आरबीआयच्या नवीन सवलतीमुळे ३० ते ४० टक्क्यांचा तोटा सहन करुन बॅंकेने तब्बल १४७ कोटी ढोबळ नफा कमवला आहे.
चौकट ०२
शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती
गेल्यावर्षी ७ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते पूर्ण करुन आकडा ७ हजार १२८ कोटींवर नेला. पुढील वर्षी शून्य टक्के एनपीएसह १० हजार कोटींच्या ठेवी व २०० कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
चौकट ०३
स्वनिधी झाला दुप्पट
चार वर्षात स्वनिधीमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून आकडा ७०० कोटींवर पोहचला आहे.
चौकट ०५
बॅंकेची सद्यस्थिती
एकूण ठेवी : ७ हजार १२८ कोटी
निव्वळ एनपीए : २.२० टक्के
सीआरएआय प्रमाण १२.२५ टक्के
चौकट ६
कर्जावरील व्याज दरात कपात
खावटी, किसान सहाय्य, शेती मध्यम मुदत, साखर कारखाने, सूत गिरण्या, सोनेतारण, व्यक्तिगत या कर्जावरील व्याजाच्या अर्धा ते एक टक्का दराच्या कपातीचा लाभ १ एप्रिलपासून घेता येणार आहे.
प्रतिक्रिया
गेली सहा वर्ष बॅंकेचा अध्यक्ष या नात्याने पारदर्शी व काटकसरीने कारभार करुन बॅंकेला वैभव मिळवून दिले. आधी सांगितल्याप्रमाणे वसुलीसाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम केले, याला सर्वच घटकांचे सहकार्य लाभले, याबद्दल मी कृतज्ञ आहे.
हसन मुश्रीफ, अध्यक्ष, जिल्हा बॅंक