गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : येथील पालिका निरीक्षक महिपती बाबर यांनी आपल्या मुलीचा व मुलाचा विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. ना अंतरपाठ, ना कर्मकांड यांना फाटा देत अक्षता ऐवजी उपस्थितांना गुलाबपुष्प देऊन अक्षताचे तांदूळ वृद्धाश्रमाला दिले. पुस्तकांपासून वाचक दूर जात असल्याने व पुस्तक हाच खरा मित्र आहे, हा संदेश देण्यासाठी लग्न समारंभात पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. नववधू-वरांनी प्रथम पुस्तक खरेदी करून इतरांना पुस्तक घेण्यास प्रवृत्त केले. लग्न समारंभातील बाबर कुटुंबाचा हा अभिनव उपक्रम आदर्शवत ठरला. महिपती बाबर येथील पालिकेत विधी व कामगार पर्यवेक्षक म्हणून सेवेत आहेत. येथील जैन सांस्कृतिक भवनात त्यांनी मोरेश्वर या मुलाचा ममदापूर (ता. चिक्कोडी) येथील तृप्ती या मुलीशी, तर कन्या मिराचा राशिवडे (ता. राधानगरी) येथील रोहितशी विवाह लावण्यात आला. बाबर हे मुळातच अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या विरोधी विचारांचे असल्याने आपल्या मुलाचा व मुलीचा विवाह पारंपरिक पद्धतीने न करता प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. लग्नपत्रिकेत देवांचे नाव न घालता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांची प्रतिमा छापण्यात आली होती. लग्न सोहळ्याची सुरुवात मंडपात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. उपस्थितांना गुलाबपुष्प देण्यात आले होते. लग्नातील विधी, कर्मकांड, आंतरपाठ यांना फाटा देत नववधू-वरांना पुरोहितांना विवाह बंधनातील कर्तव्याची माहिती देऊन शपथ दिली. लग्नात अक्षता टाकून ती पायदळी तुडविली जाते. त्यामुळे अक्षता न टाकता वधू-वर माता-पित्यांनी केवळ गुलाब फुलांच्या पाकळ्या टाकून अक्षताचे तांदूळ वृद्धाश्रमाला दिले.पुरोहित डॉ. राजीव चव्हाण यांनी मंगलाष्टकांऐवजी जिजाऊ वंदना व शिवसप्तक गायिले. वरांनी वधूला मंगळसूत्राऐवजी शिवमुद्रा गळ्यामध्ये घातली. तरुण पिढी वाचनापासून दूर जात असल्याने त्यांच्यामध्ये वाचनाची आवड व प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिवसप्तकानंतर वधू-वरांनी पुस्तके खरेदी करून इतरांनीही पुस्तके घ्यावीत यासाठी प्रोत्साहित केले. तसेच लग्न कार्यालयातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तेरवाड (ता. शिरोळ) येथील मराठा मंडळाच्या नियोजित कार्यालयाच्या बांधकामास एक लाख एक हजाराची बाबर कुटुंबीयांनी देणगी दिली. या विवाह समारंभातून अनावश्यक खर्चाला फाटा दिला.
लग्न सोहळ्यात पुस्तकांचे प्रदर्शन
By admin | Updated: May 25, 2017 23:10 IST