कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नऊ समित्यांमधील १४ रिक्त पदांवर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नियुक्ती होणार आहेत. यामध्ये स्थायी समितीमधील दोन तर बांधकाम विभागाच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यासाठी समन्वयक कारभाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजता ही निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. १४ रिक्त जागांसाठी तेवढेच अर्ज आले तर निवडणूक बिनविरोध होईल. शक्यतो ही निवड बिनविरोधच होते. तसे प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समितीमध्ये राहुल पाटील अध्यक्ष झाले तर जयवंतराव शिंपी हे उपाध्यक्ष झाले. त्यामुळे या दोन जागांसाठी रस्सीखेच आहे. यातील एक नाव ग्रामविकास हसन मुश्रीफ सुचवणार आहेत तर एक नाव पालकमंत्री सतेज पाटील सुचवणार आहेत. मुश्रीफ यांच्याकडून माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसमधून माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना कृषि समितीची मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री कोणते नाव सुचवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. कदाचित शिवसेनेचा रोष कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते हंबीरराव पाटील यांनाही स्थायीवर संधी मिळू शकते.
बांधकाम समितीच्या एका जागेसाठी शिल्पा चेतन पाटील आणि मनोज फराकटे यांची नावे चर्चेत आहेत. समाजकल्याणसाठी माजी सभापती स्वाती सासने, महिला बालकल्याणसाठी माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, शिक्षणसाठी माजी सभापती प्रवीण यादव यांची नावे निश्चित मानली जात आहेत. तर पंचायत समित्यांच्या नवीन सभापतींनाही समित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
चौकट
निवडणूक लागलीच तर
ही निवडणूक पसंतीक्रमानुसार असल्याने पध्दत खूपच किचकट आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जलजीवनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक संजय अवघडे आणि शिवाजी विद्यापीठातील विष्णू खाडे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत नियोजन केले.