लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड -कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याच्या अनुषंगाने धामोड ग्रामपंचायतीने ९ एप्रिल २०२०पासून येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा बंद असलेला आठवडी बाजार वर्षभरानंतर आज पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला आहे. या बाजारासाठी जवळपासच्या पंचवीस वाड्या-वस्त्यामधील लोक बाजारासाठी येत असतात. तर कोल्हापूर,गारगोटी व कर्नाटकातील व्यापारी व्यापाराच्या अनुषंगाने या बाजारात येतात. हा बाजार सुरू झाल्याने परिसरातील छोटो - मोठे शेतकरी व्यापारी सुखावले असून आपल्या शेतात पिकवलेला माल स्थानिक बाजारपेठेत विक्री होत असल्याने मालाची नासाडी ही टळणार आहे.
धामोड (ता. राधानगरी ) येथील आठवडा बाजार हा परिसरातील तीस वाड्या-वस्त्यांची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. राधानगरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील ही बाजारपेठ आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराबरोबरच जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी लोक येथे येत असतात . पण गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी भरणारा शनिवारचा आठवडी बाजार बंद झाल्याने व्यापारपेठ पूर्णत: बंदच होती. व्यापारपेठ बंद असल्याने स्थानिक शेतकरी व्यापारी मोठ्या संकटात सापडला होता. परिसरातील शेतकरी या बाजारपेठेत नाचणा, भात,वरणा इत्यादी धान्य विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करत असतात. पण बाजारपेठच बंद झाल्याने हे देवघेव व्यवहार पूर्ण ठप्प झाला होता.
गेल्या गेल्या वर्षभरापासून बंद असलेला आठवडी बाजार सुरू झाल्याने सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. परिसरातील वाड्या-वस्त्यावरील लोक दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदीसाठी आज बाजारपेठेत जमल्याने बाजारपेठ माणसांच्या गर्दीने फुलली होती. स्थानिक कमिटीने बाजार सुरू करण्याचा घेतलेला हा निर्णय लहान-मोठे व्यापारी भाजीपाला विक्रेते व शेतकरी यांच्या फायद्याचा ठरला आहे.
फोटो ओळी= धामोड (ता. राधानगरी ) येथील वर्षभराच्या विश्रांतीनंतर भरलेला आठवडी बाजार नागरिकांच्या गर्दीने फुलला.