कोल्हापूर : भंडाऱ्याची उधळण, आरती, ‘उदं गं आई...’चा गजर करत..पाना-फुलांनी सजलेल्या एस.टी.त बसून आज, बुधवारी कोल्हापुरातील भाविक सौंदत्तीला रवाना झाले. मध्यरात्रीपासूनच एस. टी. बसेसनी सौंदत्तीची वाट धरली. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या यात्रेसाठी गेल्या आठ दिवसांपासून भाविकांची तयारी सुरू होती. देवीच्या पूजेसाठी साहित्यांची जुळवाजुळव, नैवेद्य, लिंब नेसणे या सर्व विधींची महिलांनी तयारी केली. एस.टी. महामंडळाने काल संध्याकाळीच एस.टी. बसेस त्या-त्या भागातील गाडीप्रमुखांना दिल्या होत्या. काल रात्री दहा ते बारा यावेळेत दहा, आणि बारा वाजल्यापासून सकाळी सात आठ वाजेपर्यंत सौंदत्तीला रवाना होत होत्या. पेठा-पेठांमध्ये आणि गल्लोगल्ली फुलांनी आणि उसाच्या धाटांनी सजलेल्या एस.टी. बसेस उभ्या राहिल्या. रेणुका देवीच्या प्रतिमेची, एस.टी. बसेसची पूजा आणि भंडाऱ्याची उधळण करत एक-एक बस सौंदत्तीकडे मार्गस्थ होत होती. या भाविकांना सोडण्यासाठी नातेवाईकांचीही तितकीच गर्दी होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ठरावीक मार्गापर्यंत नागरिक बसेसना निरोप देत होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहती शेजारील लक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन सौंदत्तीकडे रवाना होत होते. यंदा या यात्रेसाठी एस.टी.च्या १३९ बसगाड्यांचे बुकिंग झाले होते. आज सकाळी संभाजीनगर बसस्टँड येथून १०७, मध्यवर्ती बसस्थानकमधून १८ बसेस सौंदत्तीकडे रवाना झाल्या.
भाविक सौंदत्तीला मार्गस्थ
By admin | Updated: December 4, 2014 00:38 IST