शिरोळ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आले. ही रक्कम खात्यावर जमा न केल्यास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
२०१९ मध्ये महापूर, २०२० मध्ये कोरोनाची महामारी तर ऑक्टोबर २०२० मध्ये अचानक अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोो आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रती गुंठा शंभर रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करुन ती रक्कम तहसील कार्यालयांना पाठविली होती. मात्र, ही रक्कम जमा होऊन कित्येक दिवस उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा देखील झालेला आहे. आवश्यक ती कागदपत्रेही तहसील कार्यालयात जमा आहेत. असे असताना रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर कृष्णा गावडे, शशिकांत काळे, भूषण गंगावणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.