‘पर्युषण’मध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणीमिरज : जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण पर्व काळात जिल्ह्यातील कत्तलखाने व मांसविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदेनाव्दारे केली आहे. ३० आॅगस्ट ते ९ सप्टेंबर कालावधित पर्युषण पर्व साजरे करण्यात येते. विविध आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. या काळात मिरज, सांगलीसह जिल्ह्यातील कत्तलखाने बंद ठेवावेत, मांसविक्रीला मनाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गुजरात व राजस्थानात पर्युषण काळात सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातही पर्युषण काळात, गणेशोत्सव काळात कत्तलखाने बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरविकास विभागाने २००४ मध्ये परिपत्रकात सर्व महापालिका व नगरपालिका हद्दीत मांसविक्री बंद ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. नगर विकास विभागाच्या परिपत्रकाच्या प्रतीही निवेदनासोबत देण्यात आल्या. बंडू चौगुले, विजय चौगुले, अरुण चौगुले, सचिन चौगुले, किरण गौरवाडे, संजय चौगुले, संकेत गौरवाडे, अभिजित पाटील यांनी निवेदन दिले. (वार्ताहर)
‘पर्युषण’मध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी
By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST