ग्रामीण भागातील लोककलावंतांनाही बांधकाम कामगारांप्रमाणे महिना १५०० रुपये मानधन द्या, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोककला संघाच्या आजरा शाखेतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील हलगीवादक, ढोलकीवादक, लेझीम पथक, शाहीर, तमाशा मंडळ, गोंधळी, डवरी, सोंगी भजन, कलापथक अशा लोककला सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यात्रा-जत्रा, सण-उत्सव, समारंभ बंद असल्यामुळे काम मिळत नाही. त्यामुळे कलेवरच जीवन अवलंबून असलेल्या लोककलाकारांची परिस्थिती हलाखीची बनली आहे.
लोककलाकारांनी तुटपुंज्या बिदागीवर रामायणातील सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला आहे. त्याला शासनाने आधार द्यावा. त्यासाठी कलावंतानाही आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी कलावंतांच्या बैठकीत झाली.
यावेळी संघटनेचे आजरा तालुकाध्यक्ष राजाराम कोपटकर, शाहीर जानू पाटील, सोनाबाई कदम, शकुंतला बिरंबोळे, मारुती केसरकर, दिनकर कुंभार, गुरुनाथ डवरी आदी उपस्थित होते.