पुरोगामी शिक्षक संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बालकांच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच शाळांना इयत्ता पाचवीचे वर्ग जोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर इयत्ता आठवीचे वर्ग सातवीपर्यंतच्या वर्गांना विनाअट जोडावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, महापालिका शाळांतील शिक्षकांचे वेतन अनुदान १०० टक्के शासनाकडून मिळावे, चालू शैक्षणिक सत्राची सांगता जूनअखेर करून १५ जूलैपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू करावे, इयत्ता सहावी ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळांना ३६ पटास तीन विषय शिक्षक पदे मंजूर व्हावीत, जिल्हांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदली धोरणांतील त्रुटी दूर कराव्यात, जिल्हा परिषद शाळा स्वच्छतागृहे स्वच्छतेबाबत स्पष्ट निर्देश व्हावेत, विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासोबत पौष्टिक आहार म्हणून दररोज दूध मिळावे, आदी मागण्यांचे निवेदन मंत्री गायकवाड यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, पी. आर. पाटील, विलास पिंगळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले. यावेळी प्रसाद पाटील, एस. के. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१७०१२०२१-कोल-पुरोगामी)