सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकला असून, भाजपने कणकवली मतदारसंघ गमावला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या कुडाळ मतदारसंघात कॉँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांची विजयी परंपरा खंडित झाली. त्याचवेळी त्यांचे पुत्र नीतेश राणे यांनी विद्यमान आमदार प्रमोद जठार यांचा कणकवली मतदारसंघात पराभव केला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली. या मतमोजणीसाठी सी.आर.पी.एफ.चे जवान, तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक १०,३७६ च्या मताधिक्याने विजयी झाले. वैभव नाईक यांना ७०,५८२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना ६०,२०६ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार विष्णू मोंडकर यांना ४,८१९ मते, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कसालकर यांना १,०७१ मते, राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांना २,६३२ मते, अपक्ष उमेदवार स्नेहा केरकर यांना ७४७ एवढी मते मिळाली आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांचा काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांनी तब्बल २५,९७९ मतांनी पराभव केला. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांच्यावर अवघ्या ३४ मतांनी मात करीत प्रमोद जठार यांनी विजय मिळविला होता. प्रमोद जठार यांना ४८,७३६ तर नीतेश राणे यांना ७४,७१५ मते मिळाली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी तब्बल ४१,१९२ मतांचे मताधिक्य मिळवित दणदणीत विजय मिळविला. दीपक केसरकर यांनी विक्रमी ७०,९०२ मते मिळविली. या मतदारसंघात भाजपचे राजन तेली हे २९,७१० मते मिळवून दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत गावडे यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात पंतप्रधान मोदी व काँग्रेस नेते नारायण राणे यापैकी कोणाचाच प्रभाव दिसला नाही. केसरकरांना विजयी घोषित केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)आयाराम-गयारामांना जनतेने नाकारलेसावंतवाडी मतदारसंघात प्रस्थापित आमदार दीपक केसरकर यांना पराभूत करण्यासाठी कणकवलीतून सावंतवाडी मतदारसंघात जाऊन मनसेतर्फे परशुराम उपरकर, भाजपतर्फे राजन तेली निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, या दोघांनाही सावंतवाडीतील जनतेने नाकारत स्थानिक असलेले शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे ते ४१ हजारांचे मताधिक्य घेऊ शकले.२४ पैकी १७ जणांची अनामत जप्तसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी कणकवली मतदारसंघात सहा, कुडाळ मतदारसंघात चार आणि सावंतवाडी मतदारसंघात सात, अशा एकूण १७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. म्हणजे तीन मतदारसंघांत विजयी आणि पराभूत, असे सहा उमेदवार; तर सावंतवाडी मतदारसंघातून काँग्रेसचे बाळा गावडे हे अनामत वाचविण्यात यशस्वी ठरले.
नारायण राणेंचा गड ढासळला
By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST