चंदगड : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस कारखान्यात (ओलम अॅग्रो इंडस्ट्रीज) साखरेची पोती ट्रकमध्ये भरत असताना साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर कोसळून शिवाजी गुंडू पाटील (रा. कुदे्रमानी, जि. बेळगाव) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर चाराप्पा कोलारी (रा. चंदकोट, ता. शिंदगी, जि. विजापूर) हा कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. काल, सोमवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली.कारखाना गोडावूनमधील साखरेची पोती ट्रकमध्ये भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार व चेन यामधील शिफ्ंिटग कन्व्हर्टर बेल्ट जोडण्यासाठी शिवाजी पाटील गेले होते. त्यांच्या मदतीसाठी चाराप्पाही गेले होते. मोटारीला बेल्ट बसविताना थप्पीतील जवळपास ३०० पोती या दोघांच्याही अंगावर पडली. यामध्ये शिवाजी यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर चाराप्पा गंभीर जखमी झाले. त्यांना बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.शिवाजी यांनी आयटीआय करून फिटर पदवी घेतली होती. ते कुशल कामगार म्हणून कारखान्यात परिचित होते. नरगुंद (विजापूर), दौलत कारखाना (हलकर्णी) येथे काही वर्षे त्यांनी नोकरी केली होती. कारखाना उभारणीच्यावेळी त्यांचे कौशल्य बघून व्यवस्थापनाने त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली होती. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात दिला. कुद्रेमानी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. याबाबतची वर्दी इम्रान हुसेन सय्यद यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. एम. रेडेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
साखरेची पोती अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
By admin | Updated: September 10, 2014 00:28 IST