कोल्हापूर : विक्रमी मतदान व मतदारांत असलेली सुप्त लाट यांमुळे उमेदवारांचा मतदानानंतरचा आजचा गुरुवारचा दिवस तसा धाकधुकीतच गेला. उमेदवार दिवसभर विभागवार मतदानाचा आढावा घेऊन आकडेमोड करण्यात दंग होते; तर सरकारी कार्यालयांमध्ये मतमोजणीच्या तयारीबाबत नियोजन सुरू असल्याचे चित्र राहिले. उमेदवारांच्या निवासस्थानी व कार्यालयात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची दिवसभर वर्दळ होती. ‘प्रचारातून सुटलो एकदाचा’ असा भाव कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर असला तरी तणावही दिसत होता. कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणुकीत मदत झालेल्या प्रमुखांशी संवाद साधून आभार व्यक्त केले.गेले महिनाभर पहाटे पाच वाजताच दिवसाची सुरुवात होणाऱ्या उमेदवारांची आजच्या दिवसाची सुरुवात आठनंतरच झाली. काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर त्यांनी मतदान केंद्रांवरील नियोजन, भागातील वातावरणाचा कानोसा घेतला. यानंतर संवाद साधून ‘निश्चिंंत राहा, विजय आपलाच आहे’ असा दिलासा नेते व कार्यकर्ते एकमेकांना देत होते. प्रचाराचा ताण कमी झाला असला तरी निकालाची धास्ती नेत्यांसह कार्यकर्त्यांना लागून राहिली. कार्यकर्ते पै-पाहुणे, गटाचे कार्यकर्ते यांना फोन करून कुणाला किती मतदान झाले यासंबंधीचा कानोसा घेत होते. (प्रतिनिधी)‘थिंक टॅॅँक’ व्यस्तउमेदवारांसाठी प्रचाराच्या नियोजनापासून भाषण व जाहीर टीकाटिप्पणी कोणावर करायची, कोणाला गोंजरायचे याचे नियोजन करणारी पडद्यामागील थिंक टॅँक आज दिवसभर व्यस्त होती. ‘जोडण्या’ करण्यात तज्ज्ञ असणाऱ्या या पडद्यामागील सूत्रधारांबरोबर उमेदवारांनी स्वतंत्र बैठक घेतली. कोण कोणाकडे गेला, कोणी कोणाला मदत केली, ऐनवेळी कोणी दगा दिला, कोणाची रसद मिळाली, याचा आपल्यास कोणता फायदा होईल? याची आकडेमोड करण्यात उमेदवारांसह त्यांचे हे पडद्यामागील सूत्रधार व्यस्त होते.दिवस व्यस्तचमाजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी आठ वाजल्यापासून घरी व कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. यानंतर मतदानाचा आढावा घेऊन उद्योगाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती लावली. सायंकाळी कुटुंबीयांसमवेत वेळ घालविला; तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मतमोजणीची प्राथमिक आढावा बैठक घेतली. मतदानाचा अंदाज घेऊन मदत केलेल्यांशी संवाद साधला. अशाच थोड्याफार फरकाने सर्वच उमेदवारांचे मतदानानंतरच्या पहिल्या दिवसाचे नियोजन होते. माजी आमदार पी.एन.पाटील यांना भेटण्यासाठी कालपासूनच कार्यकर्त्यांची रीघ लागली. आमदार चंद्रदीप नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानीही भागातील कार्यकर्त्यांची वर्दळ राहिली.कार्यकर्त्यांची विश्रांतीनिवडणुकीच्या काळात सकाळी उठल्यापासून प्रचारच डोक्यात असायचा. आज गाड्या किती लागणार, त्यांच्या डिझेलच्या पैशांची जोडणी काय झाली आहे, कार्यकर्ते आज कोणत्या गावात जाणार, सभांचे नियोजन यामध्येच सकाळचे नऊ वाजत होते. पहिल्या आघाडीवर लढणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आज दिवसभर विश्रांतीमध्ये घालविला. धावपळीमुळे थकलेल्या शरीराला व मनाला दिवसभर विश्रांती घेऊन उभारी देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
धाकधुकीत सरला उमेदवारांचा दिवस
By admin | Updated: October 17, 2014 00:38 IST