मूळ मंदिराचे सौंदर्य न झाकोळता दर्शन मंडप गरजेचा ! : भौगोलिक विचार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:15 AM2018-02-21T01:15:54+5:302018-02-21T01:17:27+5:30

The Darshan Pavilion is not needed for the beauty of the original temple! : Geographical considerations are necessary | मूळ मंदिराचे सौंदर्य न झाकोळता दर्शन मंडप गरजेचा ! : भौगोलिक विचार आवश्यक

मूळ मंदिराचे सौंदर्य न झाकोळता दर्शन मंडप गरजेचा ! : भौगोलिक विचार आवश्यक

Next
ठळक मुद्देनव्या इमारतीवर ९ कोटी खर्च करण्याऐवजी परिसरातीलच वास्तूला दर्शनमंडपात रूपांतरित करावेमहापालिकेने छत्रपतींशी रितसर संपर्क साधून याबाबतचा प्रस्ताव दिला पाहिजे,

श्री अंबाबाई मंदिराच्या ८० कोटींच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्याला शासनाने नुकतीच मंजुरी दिली. मात्र नव्या आराखड्यातील काही प्रस्ताव चुकीचे आहेत. काही ठिकाणी नव्या संकल्पनांचा विचार आवश्यक आहे. केवळ इमारती बांधून विकास साधण्याऐवजी आहे ते सौंदर्य जपत अधिक सोयी-सुविधा कशा देतील यावर भर दिला पाहिजे. अन्यथा या आराखड्याची अवस्थाही आणखी एक रेंगाळलेला प्रकल्प अशी होईल. तसे होऊ नये व काय व्हावे हे सांगणारी वृत्तमालिका..

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखड्यानुसार दक्षिण दरवाजाबाहेर भव्य दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. मात्र, हे ठरविताना हेरिटेज निकषांचा व भौगोलिक परिसराचा विचार करण्यात आलेला नाही. नवी इमारत वास्तुरचना सुरक्षा व भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीनेही चुकीचे असल्याचे मत हेरिटेज कमिटी व आर्किटेक्ट संस्थांनी दिले आहे.
परिसरातीलच एका वास्तूला दर्शनमंडपात रूपांतरित करणे अधिक संयुक्तिक, कमी खर्चात आणि तातडीने होणारी गोष्ट आहे. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे तिथे हा दर्शन मंडप झाल्यास मूळ मंदिरही झाकोळले जाणार आहे.
अंबाबाई मंदिराच्या आराखड्यात सर्वांत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे ती दक्षिण दरवाजासमोरील दर्शन मंडपाची. वास्तविक ही नवी इमारत बांधण्याची खरंच गरज आहे का आणि ते योग्य आहे का याचा विचारच आराखड्यात केलेला नाही.
दक्षिण दरवाजाचा बाह्य परिसर मोकळा असल्याने नवरात्रातही लाखोंच्या गर्दीचा ताण येत नाही, भक्त विभागले जातात. असे असताना या जागेवर केवळ दीड हजार भाविकांची क्षमता असलेल्या नव्या दर्शन मंडपावर ९ कोटींचा खर्च केला जाणार आहे व तो अनावश्यक आहे. पुरातन वास्तूसंबंधी निर्णय घेण्यासाठी महापालिकेने हेरिटेज समिती स्थापन केली आहे. मात्र, हा आराखडा अंतिम करताना हेरिटेज समितीला विश्वासात घेतले गेले नाही. तज्ज्ञांनाच विचारात न घेतल्याने नवी वास्तू योग्य आहे की अयोग्य हे कोण ठरविणार? असा प्रश्न आहे. अंबाबाई मंदिरासह विद्यापीठ हायस्कूल, शेजारचा राजाज्ञा वाडा, समोरील प्रांत कार्यालय, इंदूमती गर्ल्स हायस्कूल या सगळ्या वास्तू हेरिटेज आहेत त्या नियमांनुसार पाचशे मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्यासह विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या एका अनौपचारिक चर्चेत शाहू छत्रपतींनी दर्शन मंडपासाठी फरासखान्याच्या इमारतीला होकार दिला होता. महापालिकेने छत्रपतींशी रितसर संपर्क साधून याबाबतचा प्रस्ताव दिला पाहिजे, असे मत त्याक्षणी उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. (उद्याच्या अंकात : अतिक्रमण, फेरीवाल्यांचा वेढ्यात अंबाबाई)

काही पर्याय असेही...
फरासखाना : हेरिटेज कमिटीने यापूर्वीच जुना राजवाडा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या फरासखान्याचा पर्याय सुचविला आहे. ही इमारत पूर्वी अलंकार हॉटेलच्या वरच्या बाजूपर्यंत जोडलेली होती. तिला पूर्वीचे स्वरूप देऊन दर्शन मंडपात रूपांतरित करणे सहज शक्य आहे.
शेतकरी बझार : शेतकरी बझारची दुमजली इमारत अक्षरश: पडून आहे. नवरात्रौत्सवात ती तात्पुरती वापरली जाते. अंतर्गत रचनेत काही बदल केले तर दर्शन मंडप तयार होईल.
विद्यापीठ हायस्कूल, सरलष्कर भवन : विद्यापीठ हायस्कूलची इमारतही दर्शन मंडपासाठी सोयीची असेल. सरलष्कर भवन इमारतीचा पर्यायही विचारात घेता येईल, कारण तेथूनच मुख्य गाभारा दर्शनाची रांग जाते.

मूळ आराखडा : २५५ कोटींचा; त्याचे तीन टप्पे
पहिला टप्पा मंदिर विकास व भाविकांच्या सोयी-सुविधा
दुसरा टप्पा परिसर सुशोभीकरण
तिसरा टप्पा मंदिराला जोडणारा शहर विकास
पहिल्या टप्प्यासाठी आर्थिक तरतूद
तीन महिन्यांत मंजूर ८० पैकी २५ कोटी मिळणार
प्रत्यक्ष कामाला तीन महिन्यांनंतरच सुरुवात
पावसाळा, लोकसभा निवडणुकांची अडचण शक्य
 

नियम आणि सोय या दोन्ही दृष्टीने दर्शनमंडपासाठी नवी इमारत उभारणे चुकीचेच आहे. उत्सव काळात अग्निशमन दलाच्या गाड्या, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिसांची वाहने यासह आपत्तीच्या काळासाठी म्हणून ही जागा मोकळी असणे अतिशय गरजेचे आहे.
- उदय गायकवाड  सदस्य, हेरिटेज समिती

आराखड्यात दर्शन मंडपाचा समावेश करताना फोट्रेस कंपनीने भौगोलिक परिसराचा अभ्यास केलेला नाही. महापालिकेनेही यावर हेरिटेज समितीला अभिप्रायही विचारलेला नाही. दर्शन मंडपासाठी फरासखान्याची इमारत सुचविली आहे.
- अमरजा निंबाळकर अध्यक्षा, हेरिटेज समिती

Web Title: The Darshan Pavilion is not needed for the beauty of the original temple! : Geographical considerations are necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.