इचलकरंजी : आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सारण, गटारी स्वच्छ करणे, साथीचे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घेणे, आयजीएम रुग्णालयात औषध साठा करणे गरजेचे आहे. तसेच शहरात असणार्या धोकादायक ६० इमारतींच्या संबंधितांना इमारत पाडून घेण्याबाबत नोटीस देऊन प्रसंगी इमारत पाडण्याची कार्यवाही करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इचलकरंजी पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्कालीन विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागातील प्रमुख आणि नगरसेवक यांची आज, शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आपत्कालीन परिस्थितीतील विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचार्यांनी केलेल्या सूचनांवरही ऊहापोह करण्यात आला. त्यानंतर ३१ मे पूर्वी सखल सारण, गटारी स्वच्छ करणे, पाणी साचत असलेल्या सखल भागात नवीन वस्ती होणार नाही याची दक्षता घेणे, साथीचे आजार पसरू नयेत म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात स्वतंत्र विभाग आणि औषध साठा सज्ज ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधित आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना अपवाद वगळता रजा मिळणार नाही, असे प्रशासनाने सांगितले. कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी आपत्कालीनचा कृती आराखडा आॅनलाईन जाहीर झाला असून, सर्वांनी आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून सज्ज राहण्याचे आवाहन केले. बैठकीस नगराध्यक्ष बिस्मिल्ला मुजावर, पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि आपत्कालीन विभागातील प्रमुख उपस्थित होते.
धोकादायक ६० इमारती पाडणार
By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST