कोपार्डे : बालिंगा पुलाच्या पिलरच्या मजबुतीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले आहे. हे काम करण्यासाठी पुलाच्या पूर्वेकडील बाजूने नदीच्या मध्यभागी दगड मुरुम यांचा भराव टाकण्यात आला आहे. मात्र, तो भराव अद्यापही उचलला गेला नसल्याने नदीतील पाण्याच्या प्रवाहाचा दाब पश्चिमेकडील बाजूस असलेल्या पुलाच्या एकाच गाळ्यावर पडत असल्याने या पिलरला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भराव कंत्राटदार कधी उचलणार असा सवाल उपस्थित होत आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे १३५ वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल आहे. पुलाचे सर्व बांधकाम आखीव व रेखीव दगडी आहे. या पुलाला चार पिलर, पाच गाळे आहेत. नदीच्या मध्यभागी असणाऱ्या दोन पिलरच्या तळभागातील दगड निखळून पडू लागले. ते दुरुस्ती करण्याबरोबरच आरसीसी कॉंक्रीट पिचिंग व दगड बसविण्याचे काम करण्यासाठी पुलाच्या पूर्वेकडील बाजूने नदीच्या मध्यभागी दगड मुरुम यांचा भराव टाकण्यात आला आहे. हा भराव नदीच्या पात्रात पिलरच्या उत्तर दक्षिण किमान २५ ते ३० फूट टाकला आहे. या पिलर शेजारी टाकण्यात आलेला भराव गेली दोन वर्षे हटविण्यात आलेला नाही. यामुळे पश्चिमेला असणाऱ्या एकाच पिलरवर पावसाळ्यात पुराच्या प्रवाही पाण्याचा दाब पडत आहे. यामुळे या पिलरला धोका होण्याची शक्यता आहे.
हे काम २०१९ मध्ये सुरू करण्यात आले व वर्षभरात ते पूर्णही करण्यात आले. पण नदीच्या मुख्य प्रवाहात टाकण्यात आलेला हा भराव अद्यापही का काढला नाही असा सवाल स्थानिक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
कोट :
गेली दोन वर्षे कामासाठी नदीच्या मुख्य पात्रात मोठ्या भराव टाकण्यात आला आहे. पूर्वेकडील बाजूने भराव टाकण्यात आल्याने पश्चिमेकडील एकाच पिलरवर त्याचा पुराच्या प्रवाही पाण्याचा दाब पडत आहे.
यामुळे या पिलरला धोका होऊ शकतो. नदीच्या मध्यभागी टाकण्यात आलेला भराव काढून घ्यावा.
- कृष्णात माळी, बालिंगा ग्रामस्थ
फोटो: २४ बालिंगा पूल
बालिंगा पुलाच्या दुरुस्तीसाठी नदीच्या मध्यभागी टाकण्यात आलेला भराव गेली दोन वर्षे तसाच पडून आहे.