कसबा बावडा : डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रकाश बेहेरे यांची नियुक्ती कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केली. डॉ. बेहेरे वर्धा येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मनोविकृत्ती विभागात प्राध्यापक विभाग प्रमुख व संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांनी चंदीगड येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधक संस्थेतून एम. डी. केले. त्यांना व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रांतील ३३ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी इंग्लंड येथील चेस्टर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तसेच ते अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठाचे अॅडजंक्ट प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पारितोषिक व डॉ. बागाडिया जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागत समारंभात बोलताना डॉ. बेहरे म्हणाले, हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीयस्तरावर कसे नावारूपाला नेता येईल, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढाव घेतला अणि नवीन कुलगुरू त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कुलसचिव डॉ. विश्वराय भोसले यांनी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा यांनी आभार मानले. यावेळी कृष्णा अभिजित विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा तसेच विद्यापीठाचे अधिकारी, सर्व प्राचार्य, विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रकाश बेहेरे रूजू
By admin | Updated: June 11, 2016 01:09 IST