कोल्हापूर : खेळ आणि शिक्षण यामध्ये एकाचवेळी यश मिळवणे तसे अवघडच. एकतर शिक किंवा खेळ असाच सल्ला अनेक पालक आपल्या पाल्यांना देतात. मात्र, महाराष्ट्र हायस्कूलमधील संचित संतोष तेलंग या विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या फुटबॉलमध्ये गोलचा पाऊस पाडतानाच दहावीच्या परीक्षेतही ९९ टक्के गुण मिळवत आपल्या करिअरमध्ये पेनल्टी स्ट्रोक मारला आहे.शिवराईनगर येथे राहणाऱ्या संचितला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड. पण, ही आवड जोपासताना त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. रोज फुटबॉल खेळून झाल्यानंतर अभ्यास हे त्याचे ठरलेले नियोजन. संचित सध्या पीटीएम ब संघाकडून खेळत आहे. महाराष्ट्र हायस्कूलमधून खेळताना त्याने आपल्या चमकदार कामगिरीने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. बालेवाडी, कोल्हापूर व लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखविली होती. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय स्पर्धेतही तो चमकला. नुकताच तो अंदमान येथे झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतही सहभागी झाला होता. महाराष्ट्र हायस्कूलचा “बेस्ट स्टुडंट ऑफ द इअर“चा बहुमानही त्याने पटकावला आहे. संचितचे वडील हे कोल्हापूर पोलिस दलात असून, तेही उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू आहेत. संचितने वडिलांचे गुण अंगिकारले असून, पुढे सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
कोल्हापुरातील संचित तेलंगचा दहावी परीक्षेतही पेनल्टी स्ट्रोक, फुटबॉलची आवड जोपासत मिळवले ९९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:00 IST