मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात जाहीर केलेल्या चौदा दिवसांच्या कर्फ्यूस मंगळवारी रात्रीपासून प्रारंभ झाला. दरम्यान, कर्फ्यू सुरू होणार असल्याने निपाणी शहरात तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. बाजाराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कर्नाटक शासनाने १४ दिवसांचा कडक कर्फ्यू जाहीर केला आहे. या कर्फ्यूची अंमलबजावणी निपाणी तालुक्यातही होणार असल्याने निपाणी तालुक्यातील नागरिकांनी बाजारासाठी निपाणी शहरात गर्दी केली होती. बहुतांशी ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
या १४ दिवसांच्या कर्फ्यूत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. बस सेवा बंद राहणार असून निपाणी पालिका, तालुका व पोलीस प्रशासनाने याची तयारी केली आहे. कर्फ्यूमध्ये सकाळी सहा ते दहा या वेळेत किराणा, दूध, मांस व इतर आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने सोमवारी व मंगळवारी बाजाराला नागरिकांनी गर्दी केली. गुरुवार पेठ, दलाल पेठ, चाटे मार्केट, अशोकनगर, बेळगाव नाका, साखरवाडी या मुख्य बाजाराच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होती.