बुबनाळ : नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पूल मासेमारीचा पॉईंट बनला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले असताना येथे मासेमारीसाठी गर्दी होत असते. यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. यावर पोलीस प्रशासन कारवाई केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. असे असताना नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पुलावर मासेमारीसाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासून इचलकरंजी, कुरूंदवाड, मिरजसह परिसरातील मच्छीमार मासे पकडण्यासाठी येत आहेत. नदीपात्रात एक किलोपासून २० ते २५ किलो पर्यंत मोठे मासे सापडल्याने येथे गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडून कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. परगावाहून मच्छीमार येत असल्याने धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - नृसिंहवाडी-औरवाड पुलावर अशाप्रकारे मासेमारीसाठी गर्दी होत आहे. (छाया - रमेश सुतार, बुबनाळ)