कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या असताना सुध्दा मिरवणूक काढून सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांची पायमल्ली केली, म्हणून येथील शिवाजी चौक तरुण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह १०० व्यक्तींवर शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवाजी चौक तरुण मंडळ व करवीर गर्जना ढाेल पथकातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
शुक्रवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गणेश आगमन मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणूक काढू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तरीही शिवाजी चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत पापाची तिकटी, माळकर चौक ते शिवाजी चौक अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत करवीर गर्जना ढोल पथक होते. प्रशासनाच्या आदेशाचा भंग करून सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष माजी महापौर नंदकुमार वळंजू, सुहास भेंडे, दीपक गाडवे, नंदकिशोर जमदाडे, महंमद पठाण, पंडितराव पोवार, प्रमोद सुतार, नितीन पाटील, तसेच करवीर गर्जना ढोल पथकातील प्रतीक ओतारी, अक्षय पाटील, आकाश चव्हाण, विवेक माळी यांच्यासह सुमारे १०० ते १२५ लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मुरलीधर रेडेकर यांनी फिर्याद दिली असून या सर्वांविरुध्द भादंविस कलम ३४० - २०२१, १८८, २६९ व ३४ सह साथरोग, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.