लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चोरीतील जप्त सोन्याचे दागिने मालकाला परत करण्याचा न्यायालयाने आदेश दिला, तरीही ते देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. दागिने परत मिळवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये व पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ दागिनेमालक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर आली. न्यायालयाने आदेश देऊन तब्बल दीड वर्ष उलटले तरीही गडहिंग्लज ते कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यापर्यंत त्यांचे हेलपाटे सुरू आहेत. गेले सात वर्षे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फरपट सुरू आहे, त्यामुळे हे कुटुंब हवालदिल झाले.
पाचगाव (ता. करवीर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबूराव येणेचवंडीकर हे सध्या बसर्गे (ता. गडहिंग्लज) या मूळ गावी राहतात. त्यांची मुलगी पुष्पावती परशराम ठबे (रा. पुणे) ह्या पाचगाव येथे माहेरी आल्या, त्यावेळी दि. २९ मे २०१२ रोजी रायगड कॉलनीत दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. त्याबाबत पुष्पावती अशोक येणेचवंडीकर (माहेरचे नाव) यांनी करवीर पोलिसात तक्रार नोंदवली. चोरटेही पकडले, गंठणही जप्त केले. गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. ठबे यांनी दागिने आपलेच असल्याची ओळखही पोलिसांना दिली.
पुष्पलता यांनी वठमुखत्यार वडील अशोक येणेचवंडीकर यांच्याकडे दिले. २०१४ पासून संबंधित जप्त दागिने परत मिळावेत म्हणून अशोक येणेचवंडीकर हे पोलिसांकडे चकरा मारत आहेत. प्रारंभी न्यायालयीन प्रक्रियेचे कारण पुढे करून दागिने देण्यास टाळले. दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी न्यायालयाने दागिने येणेचवंडीकर यांना परत देण्याचे आदेश दिले. तरीही पोलिसांनी दागिने परत दिलेले नाहीत, की उत्तरही नाही. चकरा मारून येणेचवंडीकर कुटुंबीय हतबल झाले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज
जप्त दागिने परत मिळवण्यासाठी येणेचवंडीकर हे २०१४ पासून अर्ज करत आहेत. न्यायालयाचा आदेशही पोलीस खाते जुमानत नसल्याची स्थिती आहे. येणेचवंडीकर यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, करवीर पोलीस ठाणे यांच्याकडे वारंवार अर्ज केले. तरीही त्यांच्या पदरी निराशाच. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचीच अशी फरपट होत असेल तर सर्वसामान्यांची काय होईल.
दोन वेळा निकाल...
हे जप्त केलेले दागिने परत देण्याबाबत एप्रिल २०१४ मध्ये न्यायालयाने आदेश दिला; पण त्याची प्रत पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलीच नाही. त्यानंतर येणेचवंडीकर यांनी पुन्हा अपील केल्यानंतर दि.४ डिसेंबर २०१९ मध्ये न्यायालयाने दागिने देण्याचा पुन्हा आदेश दिला.
मोहिते, देशमुख यांचा आदर्श
२०१७ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय मोहिते उघडकीस आलेल्या घरफोड्यांतील ५३ तोळे सोन्याचे दागिने व रोकड न्यायालयाच्या मंजुरीने कार्यक्रम घेऊन मूळ मालकांना परत केले. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनीही २०१९ व २०२० या वर्षात चोरट्यांकडून जप्त केलेले दागिने मूळ मालकांना परत केले.