लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *भुदरगड पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास कार्यालयातील पर्यवेक्षिकानी अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपयांचा ढपला पाडला असल्याची घटना माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत उघड झाली आहे. याबाबत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे आणि रोहित इंदुलकर यांनी मागवलेल्या माहितीतून हा ढपला उघड झाला आहे. दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. निवेदनातील आशय असा : प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे आणि रोहित इंदुलकर यांनी महिला बाल विकास या कार्यालयातील विविध योजनांवर केलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. त्या माहितीमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे दिसून आलेले आहेत. यामध्ये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि २०१९ साली आलेल्या महापुरावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली असताना त्याचवेळी प्रत्यक्ष प्रशिक्षण शिबिर घेतल्याचे कागदोपत्री दाखवून प्रशिक्षण आणि मीटिंग दरम्यान शासनाकडून सेविकांच्यासाठी आलेला प्रवासी भत्ता, जेवणाचा भत्ता, त्यांचे मानधन संबंधित अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांनी बोगस सह्या करून लाखो रुपये हडप करण्याची किमया या खात्याने केली आहे. कार्यालयातील एका पर्यवेक्षिकेने तर एकाच वेळी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती दाखवण्याचा पराक्रम करून दाखवलेला आहे. अनेक वेळेला सुपरवायझर प्रशिक्षणा दरम्यानचा अंगणवाडी सेविकांचा प्रवासी भत्ता शंभर ते दोनशे मीटर अंतरावर प्रवास खर्च दाखवून प्रवासी भत्त्यावर देखील डल्ला मारलेला आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण २०१८ मध्ये झालेले असताना शासन नियमानुसार प्रशिक्षणाच्या दहाव्या दिवशी मानधन देणे क्रमप्राप्त असताना २०१८ पासून संबंधित पर्यवेक्षिकेने शेकडो मुलींचे अडीचशे रुपये प्रमाणे सर्व पैशावर डल्ला मारला होता. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी संबंधित वस्तुस्थिती * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *भुदरगड पंचायत समितीच्या सभापती कीर्ती देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याच्यानंतर तातडीने दोन वर्षांपूर्वीचे पैसे नोव्हेंबर २०२०मध्ये खासगी कॉम्प्युटर सेंटरमध्ये वाटण्याचा प्रताप या पर्यवेक्षिकेने केला आहे.
या भ्रष्टाचारामध्ये सामील असणाऱ्यांची पाळेमुळे खणून दोषींवर कडक कारवई करावी अन्यथा एकात्मिक बाल विकास कार्यालयाला मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. सभापती कीर्ती देसाई,गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांना निवेदन देण्यात आली आहेत.
याबाबत प्रकल्प अधिकारी नयता इंगोले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सभापती कीर्ती देसाई यांनी या प्रकरणात दोषी आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
चौकट
सुट्टीच्या दिवशी प्रशिक्षण शिबिर दाखवून चौतीस लाख पन्नास हजार रुपयांचा ढपला पाडला असल्याची चर्चा सुरू होती, तर कुपोषित बालकांच्या संख्येत घट होण्याऐवजी जैसे थी परिस्थिती असताना तो पोषण आहार खाल्ला कोणी ? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्याची गरज आहे.
फोटो ओळ
दोषींवर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन कीर्ती देसाई यांना देताना मच्छिंद्र मुगडे,रोहित इंदुलकर.