CoronaVirus Lockdown : परफॉर्मिंग आर्टसाठी समाजमाध्यमांचा रंगमंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:26 PM2020-05-30T16:26:41+5:302020-05-30T16:29:28+5:30

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने गायन, वादन आणि नृत्य या कलांनाही बंदिस्त केले आहे. या कलांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना सध्या कुलूप आहे. जाहीर कार्यक्रमांना इतक्यात तरी मान्यता मिळणार नसल्याने या क्षेत्रातील निपुण कलाकारांनी आता समाजमाध्यमांचा रंगमंच गाजवायला सुरुवात केली आहे; तर टाळ्या, शिट्ट्यांची जागा ह्यूअर्स, लाईक आणि कमेंटने घेतली आहे.

CoronaVirus Lockdown: A social media platform for performing arts | CoronaVirus Lockdown : परफॉर्मिंग आर्टसाठी समाजमाध्यमांचा रंगमंच

CoronaVirus Lockdown : परफॉर्मिंग आर्टसाठी समाजमाध्यमांचा रंगमंच

Next
ठळक मुद्देगायन, वादन, नृत्याचे सादरीकरण टाळ्या, शिट्ट्यांऐवजी लाईक ॲण्ड कमेंट

कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने गायन, वादन आणि नृत्य या कलांनाही बंदिस्त केले आहे. या कलांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना सध्या कुलूप आहे. जाहीर कार्यक्रमांना इतक्यात तरी मान्यता मिळणार नसल्याने या क्षेत्रातील निपुण कलाकारांनी आता समाजमाध्यमांचा रंगमंच गाजवायला सुरुवात केली आहे; तर टाळ्या, शिट्ट्यांची जागा ह्यूअर्स, लाईक आणि कमेंटने घेतली आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य या कलांनी आपली परंपरा जपत रसिक श्रोत्यांना दर्जेदार कलाकृतीचा आनंद दिला. कलाकारांची साधना आणि रंगमंचीय सादरीकरणाने ती अधिक समृद्ध होते. कोरोनाने मात्र या कलांना रसिकांपासून दूर केले आहे.

कोल्हापूर ही कलेची नगरी असल्याने येथे कलेला मिळणारी दाद आणि रसिकांचा प्रतिसाद यांमुळे आठवड्यातून किमान तीन दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र गेले दोन महिने लॉकडाऊनमुळे या कलांचेही सादरीकरण थांबले आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू स्मारक हे रंगमंच बंद असताना आणि रसिकांच्या उपस्थितीवर बंधने असताना कलाकारांनी समाजमाध्यमांनाच रंगमंच बनवले आहे. लॉकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढल्याने लोक तासन‌्तास स्क्रीनवर असतात. त्यामुळे कलाकारांनी फेसबुक, इन्स्टा लाईव्ह, झूम ॲप, यूट्यूबच्या माध्यमातून आपली कला रसिकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विविध वाद्यांच्या वादनासोबतच शास्त्रीय नृत्य, गीतांवर नृत्य, कवितावाचन, कथा-कादंबऱ्यांचे वाचन केले जात आहे.

लाईव्ह शो, शिक्षण

कोल्हापुरात वादनामध्ये सतार, व्हायोलीन, तबला, हार्मोनियम; गायनामध्ये शास्त्रीय संगीतापासून सुगम संगीतापर्यंत तर नृत्यात भरतनाट्यम, कथ्थक, बॉलिवूड डान्स, पाश्चिमात्य नृत्य ते अगदी लोककलांपर्यंतचे सादरीकरण करणाऱ्या आणि शिक्षण देणाऱ्या व्यक्ती व संस्था आहेत. त्यांच्या वतीने लाईव्ह सादरीकरण व कलांचे शिक्षण दिले जात आहे.

लॉकडाऊन उठले तरी इथून पुढचा काळ कलाकारांसाठी संघर्षाचा असणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे रसिकांशी संपर्कच येणार नाही. या परिस्थितीत समाजमाध्यमांवरून आम्ही वेगवगळे नृत्यप्रकार सादर करीत आहोत. अनेकजण घरबसल्या याचे शिक्षण घेत आहेत. आता या माध्यमाचीच सवय करून घ्यावी लागणार असल्याने रसिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.
सागर बगाडे ,नृत्यदिग्दर्शक


कलाकार दर्दी रसिकांसाठी आसुसलेला असतो. प्रेक्षकांमुळे रंगमंचीय आविष्कार फुलतो. कोरोनाने आता हा अनुभवही दुरापास्त केल्याने समाजमाध्यमांचा वापर करणे ही गरज बनली आहे. थेट सादरीकरणाची सर त्याला येणार नसली तरी आमचा रियाज, साधना रसिकांपर्यंत पोहोचते याचे समाधान आहे.
सचिन जगताप, बासरीवादक.


समाजमाध्यमांकडे आजवर दुय्यमत्वाच्या नजरेतून पाहिले गेले; पण लॉकडाऊनच्या काळात या माध्यमाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. त्यापुढे जाऊन कलाकारांसाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून या माध्यमाचा वापर झाला तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष थोडा कमी होईल.
- निशांत गोंधळी, गायक, निर्माता

Web Title: CoronaVirus Lockdown: A social media platform for performing arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.