लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तब्बल सहा महिन्यांनंतर कोरोनाची दहशत कमी झाली असून, मृत्यूचा आकडाही एकपर्यंत खाली आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कोरोना संसर्गापेक्षा त्यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ टक्क्यांपर्यंत पाेहोचला आहे. शनिवारी बुबनाळ (ता. शिरोळ) मधील एका महिलेचा मृत्यू झाला.
शनिवारी ५ हजार १९९ स्वॅब तपासणी झाल्या. त्यातील ६१ जण बाधित आढळले. सध्या ७०८ जण कोरोनावरील उपचार घेत आहेत, तर १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरात रुग्णसंख्या सर्वाधिक १४ असली तरी एकही मृत्यू नाही हे विशेष. शिरोळमध्ये एक मृत्यू झाला आहे. उर्वरित आजरा, चंदगड, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांतून कोरोना हद्दपार झाला आहे. येथे एकही रुग्ण आढळलेला नाही. याउलट गडहिंग्लजमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. शनिवारी ही संख्या ८ वर पाेहोचल्याने कोरोनाबाधितांमध्ये गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात तिसऱ्या स्थानी आला. करवीर ९ रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हातकणंगलेतही ७ रुग्ण आढळले आहेत.
गणेशोत्सवामुळे कमी झालेली स्वॅब तपासणी शनिवारपासून पुन्हा पाच हजारांवर गेली आहे. त्यामुळे शुक्रवारी ५६ वर असणारा बाधितांचा आकडा पाचने वाढून तो ६१ वर पाेहोचला. संख्येत किंचित वाढ दिसत असली तरी कोरोनामुक्तीचा टक्का वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.