उत्तूर : साहेब, आमच्या घरी एकाला ताप आलाय. ऑक्सिजन लेवल कमी आलीय. आम्हाला रुग्णवाहिका हवी, आम्हाला मदत करा, अशी विनवणी उत्तूर (ता. आजरा) परिसरातील ग्रामस्थ जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्याकडे करत आहेत. कोणतेही गट-तट न पाहता काम करणारा कोविड योद्धा म्हणून उमेश आपटे यांच्याकडे पाहिले जात आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांना मदत करण्यासाठी उमेश आपटे यांची तारेवरची कसरत सुरू आहे. मुकुंदराव आपटे फौंडेशन यांच्या माध्यमातून ४० बेडचे कोविड सेंटर मुमेवाडी येथे सुरू आहे.
सकाळी ६ वाजता ते कोविड सेंटरमध्ये गेल्यानंतर रुग्णांची आस्थेने विचारपूस करतात. त्यांच्या चहा-नाष्ट्याची सोय करतात. सफाई कामगार न आल्यास स्वत: स्वच्छता करतात. दिवसभर कोविडच्या कामात व्यस्त असतात. परिसरातील अनेक गावांतून, मदत करा, म्हणून फोन येतात. कोणाला रुग्णवाहिका, कुणाला बेड हवा असेल, गंभीर रुग्णांना कोल्हापूर, गडहिंग्लजला पोहोचवायचे असेल, अशा कठीण प्रसंगात धीर देण्याचे काम उमेश आपटे यांच्याकडे सुरू आहे.
कोविड सेंटरचे रात्री-उशिरा काम संपवून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामास हजर राहतात. मुमेवाडीचे कोविड सेंटर सर्वसामान्य जनतेचे आधार केंद्र बनले आहे. उत्तूर परिसरातील ग्रामपंचायतीला ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सूचना देतात. उत्तूरसारख्या मोठ्या गावात सरपंच वैशाली आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याकडून सर्व्हे सुरू आहे. त्यांचा अहवाल येताच ऑक्सिजन लेवल कमी असणाऱ्यांची टेस्ट करून घेण्यासाठी आजरा-कोविड सेंटर येथे वाहनांची उपलब्धता करून पाठवले जाते.
अहवालानंतर उपचार पद्धती उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ठरवली जाते. त्यानंतर रुग्ण घरी येईपर्यंत आपटे यांचे कार्य सुरू असते.
---------------------
* उत्कृष्ट सेवा
मुमेवाडीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार पद्धत चांगली आहे. रुग्णांना नाष्टा, चहा, अंडी दिली जातात. जि. प. सदस्य उमेश आपटे प्रत्येक रुग्णांची चौकशी करतात. सामान्य माणसांसाठी कोविडची सेवा उत्कृष्ट आहे.
- महेश आमणगी, उत्तूर
--------------------------
फोटो ओळी :
मुमेवाडी (ता. आजरा) येथे कोविड सेंटरमध्ये काम करताना जि. प. सदस्य उमेश आपटे.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-०१
--------------------------
फोटो ओळी :
मुमेवाडी (ता. आजरा) येथील कोविड रुग्णांवर उपचार केल्यानंतर कोविडमुक्त प्रमाणपत्र कोविड रुग्णांना देताना जि. प. सदस्य उमेश आपटे व फौंडेशनचे कार्यकर्ते.
क्रमांक : ०९०५२०२१-गड-०२