कोल्हापूर : जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सध्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद असली, तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षक आणि विद्यार्थी यांना एकमेकांशी संवाद साधता यावा, यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे पाऊल टाकले आहे.
ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारा ई-कंटेंट, व्हिडिओ बनविणे, ब्लॉग तयार करणे, ॲप बनविणे, आदींबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २८०० शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान, प्रशिक्षणाचा उपक्रम दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. त्यँतील पहिल्या टप्प्यासाठी शिक्षकांनी नोंदणी केली केली. दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.जिल्ह्यात १९०० तंत्रस्नेही शिक्षकगेल्या दोन वर्षांमध्ये १९०० शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण दिले आहे. त्यांना व्हिडिओ, पीपीटी तयार करणे, दीक्षा ॲपचा वापर, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार आता गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी सांगितले.