लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेले वर्षभर कोरोनासारख्या महामारीशी लढाई करताना सर्वसामान्य नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात कार्यतत्पर असलेल्या महानगरपालिकेला शुक्रवारी कोरोनानेच धक्का दिला. महापालिकेचे उद्यान अधीक्षक अरुण दत्तू खाडे यांचे कोरोनामुळे शुक्रवारी पहाटे निधन झाले. अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या या उमद्या अधिकाऱ्याचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. हळद वाळण्यापूर्वीच त्यांना कोरोनाने हिरावून घेतल्याने महापालिका वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी गावचे रहिवासी असलेले अरुण खाडे गेल्यावर्षीच महापालिकेकडील उद्यान विभागात अधीक्षक म्हणून नोकरीस लागले होते. नोकरीवर हजर झाले आणि शहरात निर्माण झालेल्या कोरोनाच्या महामारीत त्यांना विविध टप्प्यांवर काम करावे लागले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कारोनायोध्दा म्हणून काम केले.
कोरोनाची साथ संपल्यानंतर दि. ७ मार्च रोजी त्यांचा विवाह झाला. शुक्रवारी त्यांच्या विवाहाला दोन महिनेच पूर्ण झाले होते, तोपर्यंतच त्यांच्यावर नियतीने घाला घातला. दि. १६ एप्रिल रोजी ते पळशी गावी गेले होते. दि. १९ एप्रिलला कोल्हापुरात आले. त्यापूर्वी त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्यामुळे ॲन्टिजेन चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नंतर ते आयसोलेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. तेथे त्यांना जास्तच त्रास होऊ लागल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. तरुण अधिकाऱ्याचे निधन झाल्याची वार्ता पसरताच महापालिकेत हळहळ व्यक्त होत होती.
(फोटो मिळवून देत आहे)