कोल्हापूर: घटत चाललेला कोरोना रुग्णांची संख्या रविवारी पुन्हा किंचितशी वाढू लागली आहे. ९५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. यात एक फुलेवाडीतील आहे, तर बाजारभोगाव (ता.पन्हाळा) घोसरवाड (ता.शिरोळ) येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सण- उत्सव साजरे करताना कोरोना संपला, असे समजून गाफील न राहता दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्णसंख्या ८० पर्यंत खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला होता, शिवाय मृत्यूचा आकडाही शून्यावर आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. कोरोनाचे सावट कमी झाल्याने गणरायाचे आगमन व पूजाअर्चा यांचा धूमधडाका सुरू होता. गर्दीत फिरतानाही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या जास्त दिसू लागली आहे. गाफीलपणा चालणार नाही, हे माहीत असतानाही बेफिकीरपणा सुरू आहे. परिणामी, रविवारी पुन्हा एकदा कोरोनाचे आकडे वाढू लागले आहेत.
कोल्हापूर शहरासह आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, पन्हाळ्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी येथे एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही की मृत्यू झालेला नाही. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.