कोल्हापूर : शहरातील सर्वच विभागातील व्यवहार बंद करण्यापेक्षा प्रत्येक १० वॉर्डांचा एक भाग तयार करून अशा ८ विभागांमध्ये लॉकडाऊनचे नियोजन करावे. रोज एक विभागातील व्यवहार सुरू राहतील यामुळे एकीकडे शिस्तही राहील आणि व्यवहारही सुरू राहतील, असा पर्याय महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनचे अध्यक्ष शाम जोशी यांनी पत्रकाद्वारे मांडला आहे.
शहराच्या प्रभागानुसार प्रत्येक १० वॉर्ड मिळून एक असे ८ विभाग पाडून, प्रत्येक विभागातील लोकांना खरेदी, बाजारासाठी आठवड्यातील एक दिवस फिरण्याची परवानगी द्यावी. त्यादिवशी इतर सर्व विभागांतील नागरिकांना लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवेखेरीज त्यांना बाहेर पडता येणार नाही. फक्त सर्व विभागांतील दुकाने म्हणजेच व्यापार मात्र चालू राहील, असे केल्यास एकदम होणारी गर्दी टाळता येईल आणि व्यापाऱ्यांचे नुकसानही होणार नाही. हा पर्याय शासनाने स्वीकारावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.