लोगो : खुशाली नव्हे खंडणी
शरद यादव
कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक टॅक्टर मालकांनी २ ते ३ साखर कारखान्यांकडे ऊस वाहतुकीचे करार केले आहेत. त्यामुळे ऊस तोडल्यानंतर एकाच कारखान्याला आपला ऊस जाईल, असे छातीठाेकपणे शेतकरी सांगू शकत नाही. त्याचबरोबर ऊस वाहनात भरल्यानंतर शेतकऱ्यांना पोहोच देण्याची पध्दत होती. आता नव्या जमान्यात अनेक कारखान्यांनी पोहोच देणेच बंद केले आहे. यामुळे ऊस वजनात काही गफलत झाली, तर शेतकऱ्यांनी दाद कशाच्या आधारावर मागायची, या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही.
जिल्ह्यात काही ट्रॅक्टर मालकांनी साखर कारखान्यांची यंत्रणा हाताशी धरून एकाचवेळी २ ते ३ कारखान्यांकडे करार केले आहेत. जास्तीत जास्त ऊस ओढण्यासाठी आम्ही असे करत असल्याचे ते सांगत असले तरी, याच्यामागे त्यांचा हेतू शुध्द दिसत नाही. ऊस तोड सुरू झाल्यानंतर अमुक एका कारखान्याकडे तुमचा ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते. ऊस वाहनात भरून रस्त्यावर आला की, संबंधित कारखान्याच्या अड्डयात जादा वाहने असल्याने आता दुसऱ्या कारखान्याकडे ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते. यानंतर ट्रॅक्टर शेतातून गावात पोहोचला की, शेतकऱ्याला फोन करून त्याही कारखान्याचा अड्डा जाम असल्याचे सांगत, तिसऱ्याच कारखान्याकडे ऊस नेला जातो. या सर्व प्रकाराकडे शांतपणे पाहत राहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हातात असते. कारण दाद मागायची तरी कुणाकडे, हा प्रश्न आहेच. या सर्व प्रश्नांबाबत शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.
.............
पोहोच देणे बंद
या सर्व प्रकारावर कडी म्हणजे, आता अनेक कारखान्याने ऊस तुटल्यानंतर दिली जाणारी पोहोच बंद केली आहे. यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या या हातचलाखीत ऊस वजनात काही घोळ झाल्यास, पोहोच नसल्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. १८ महिने राबून ऊस पिकवायचा अन् तोडल्यानंतर कुठल्या कारखान्याकडे गेला, हे शोधत फिरायचे, एवढेच शेतकऱ्याचे आता काम राहिले आहे.
..............
या लुटीला शेतकरीच जबाबदार
शेतकऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर लूट सुरू असली तरी ही परिस्थिती उद्भवण्यास शेतकरीच जबाबदार आहे. यड्रावसारख्या गावात ग्रामसभेत ठराव करून ऊसतोडीसाठी पैसे न देण्याचे व त्याअनुषंगाने सुरू असलेले अघाेरी प्रकार खपवून न घेण्याचा ठराव केला जातो. असे ठराव करणे सर्व गावांना शक्य आहे. मात्र रान मोकळे करण्याच्या अट्टाहासामुळे शेतकऱ्यांची चौफेर गळचेपी सुरू आहे.
............
कोट....
एकाच ट्रॅक्टर मालकाचे दोन किंवा तीन कारखान्यांकडे करार झाले असतील तर हे गंभीर आहे. कारखानदारांनी आपल्याकडे कोणत्या ट्रॅक्टरचे करार झाले आहेत याबाबत आपापसात शहानिशा करणे गरजेचे आहे. ऊस तोडीसाठी आमच्या कारखाना कार्यक्षेत्रात तरी पैसे मागितले जात नाहीत. कुठल्याही शेतकऱ्याबरोबर असा प्रकार घडल्यास कारखान्याकडे तक्रार करावी.
- गणपतराव पाटील
अध्यक्ष, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ
उद्याच्या अंकात :