७८ लाख रुपयांचा खर्च
कसबा बावडा:
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून सुमारे ७८ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राउंडवरील चार 'फ्लड लाईट' पोलची पायाभरणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी श्रीराम सोसायटीचे चेअरमन हरी पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. मैदानावर बसवण्यात येत असलेल्या फ्लड लाईटच्या एका पोलवर ५०० वॅटचे १६ बल्ब असणार आहेत. चार पोलवरील ६४ बल्बमुळे संपूर्ण पॅव्हेलियन ग्राउंड प्रकाशात उजळून निघणार आहे. त्यामुळे या ग्राउंडवर क्रिकेटचे व अन्य इतर खेळाचे डे नाईट सामने घेता येणार आहेत.
यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले, मैदानावर सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून प्रशासकीय पातळीवर अडचणी आल्यास त्या तत्काळ सोडवल्या जातील. या मैदानामध्ये, अद्ययावत बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलिबॉल कोर्ट उभारणी, कबड्डीसाठी सिंथेटिक फ्लोअर, खो-खो, रनिंग ट्रॅक, लांब उडी यासाठी सुविधा, ३ हजार स्वे.फूटचे बॉक्सिंग हॉल आदी कामे प्रगतीपथावर आहेत. वॉकिंग ट्रेक, टेज कव्हर सिटिग, दिव्यांग बंधू-भगिनींसाठी हॉल, बैठक व्यवस्थेसाठी आणि सुशोभिकरणासाठी मैदानावर नैसर्गिक आणि आर्टिफिशिअल लॉन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी श्रीराम संस्थेचे उपसभापती संतोष पाटील, माजी नगरसेविका माधुरी लाड, माजी नगरसेवक अशोक जाधव, डॉ. संदीप नेजदार, सुभाष बुचडे, गजानन बेडेकर, ॲड. नीलेश नरुटे, श्रावण फडतारे, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता हर्षदीप घाडगे, सरदार पाटील, संतोष गायकवाड, सचिन चौगले, नीलेश पिसाळ, तानाजी चव्हाण, संतोष ठाणेकर उपस्थित होते.
फोटो : २६ बावडा ग्राऊंड
कसबा बावडा पॅव्हिलियन ग्राउंडवर फ्लड लाईट पोल उभारणीची पायाभरणी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.