कोल्हापूर : कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदमध्ये काॅंग्रेसही ताकदीने उतरणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत स्टेशन रोडवरील काॅंग्रेस कमिटीत हे आंदोलन होणार आहे. स्वत: पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनात सर्व आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, विविध सेलचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या अन्यायी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला १२० दिवसांचा कालावधी उलटला, तरी केंद्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महागाई व बेरोजगारीमुळे जनता मेटाकुटीला आली असतानाही केंद्र सरकार डोळेझाक करत असल्याने देशपातळीवर शुक्रवारी हाेणाऱ्या आंदोलनात काॅंग्रेसने ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत या निमित्ताने काॅंग्रेस नेते एकदिवसीय उपोषणालाही बसणार आहेत.