सचिन यादवकोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरीलकागल आणि चंदगड सीमा तपासणी नाके सुरू राहणार की बंद होणार, याबाबतची संभ्रमावस्था राज्यभरातील वाहनधारकांत आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाने राज्यातील २२ सीमा तपासणी नाके बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बहुतांशी नाके विकसित झाले. त्यासाठी अदानी समूहाच्या महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क या खासगी कंपनीशी २४ वर्षे ६ महिन्यांसाठी सवलत करार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कार्यक्रमात तपासणी नाके बंद करण्याची घोषणा केल्यामुळे वाहनधारक संभ्रमावस्थेत पडले आहेत. सवलत करार रद्द करणार की तपासणी नाके सुरू ठेवणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
पहिल्या १०० कलमी कार्यक्रमातंर्गत राज्यातील आरटीओ सीमा तपासणी नाके बंद करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्याबाबतचा प्रस्ताव १५ एप्रिल, २०२५ पर्यंत देण्याच्या सूचना परिवहन मंत्री, राज्यमंत्री, परिवहन सचिव व आयुक्तांना केल्या. मात्र, सध्या राज्यात बीओटी तत्त्वावर २२ तपासणी नाके सुरू आहेत.राज्यातील चोरवड (जि. जळगाव), मरवडे (जि. सोलापूर), कागल (जि. कोल्हापूर), देगलूर (जि. नांदेड), इन्सुली (जि. सिंधुदुर्ग) या पाच सीमा तपासणी नाक्यांचे खासगीकरण केले आहे. तेथे आता खासगी कंपनीतर्फे करवसुली सुरू आहे. कागल सीमा तपासणी नाका अदानी उद्योग समूहातील कंपनीमार्फत चालविला जात आहे. या कंपनीतर्फे वाहनचालक-मालकांकडून सेवा प्रक्रिया शुल्क, त्यावरील सेवा कर, उपकर वसुली केली जात आहे.
रोज ६ हजार वाहनेराष्ट्रीय महामार्गावरून सरासरी रोज सहा हजार मालवाहतूक वाहनांची तपासणी होते. वाहनांमधील टनानुसार सेवाशुल्क आकारणी केली जाते. त्यातून महिन्याला लाखो रुपये मिळतात, मात्र त्या तुलनेत वाहनधारकांना सुविधा दिल्या जात नाहीत.
सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबतचे अद्याप अधिकृत कोणतेही आदेश कार्यालयाला आलेले नाही. आल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी
देशात २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर सर्व आरटीओ सीमा तपासणी नाके बंद केले जातील, असे सांगितले होते. मात्र, तरीही नाके सुरू आहेत. सेवाशुल्काच्या नावाखाली लूट सुरू आहे. - हेमंत डिसले, सेक्रेटरी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन