लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर - काखे-मांगले पुलाचे उर्वरित काम येत्या १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावे व हा मुख्य पुलाचा रस्ता वाहतुकीस खुला करून द्यावा, असे आदेश पन्हाळा -शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यामुळे आता काखे-मांगले पुलाच्या अंतिम टप्प्यातील कामास गती मिळणार आहे.
काखे-मांगले या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. सुमारे १२ कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या पुलाचे काम रखडले होते. शनिवारी सांयकाळी पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी काखे येथे जाऊन वारणा नदीवरील काखे-मांगले या मुख्य पुलाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मांगले गावाकडील पुलाच्या पिलरचे काम सुरू होते; परंतु वारणा नदीपात्रात पाणी जास्त असल्याने हे काम थांबले होते. या पिलरचे काम किमान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे अंतिम टप्प्यातील उर्वरित सर्व कामे १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून हा पूल रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्याचे आदेश आ. कोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी काखे गावचे नेते दीपक पाटील, अरविंद राठोड, संदीप पाटील, उत्तम ढोले, प्रकाश सूर्यवंशी,
पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, तसेच गावातील इतर सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ -कोल्हापूर-सांगली जिल्हा जोडणाऱ्या काखे-मांगले पुलाच्या रस्त्याच्या कामाची पाहणी शनिवारी पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. यावेळी काखे गावचे नेते दीपक पाटील (भाऊ) व इतर पदाधिकारी उपस्थित होते.