तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:46+5:302021-01-09T04:18:46+5:30

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना ...

Complaints, still Anganwadi mothers use mobile! | तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

तक्रारी, तरीही अंगणवाडी ताईंना मोबाईलच कामाचा!

Next

नसिम सनदी-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि हाताळणीसंदर्भात काही तांत्रिक अडचणी असल्या, तरी कोल्हापुरातील अंगणवाडी ताईंना मोबाईलच सर्वाधिक कामाचा ठरत असल्याचे दिसत आहे. कामेही झटपट होत असल्याने मोबाईल हा अंगणवाड्यांसाठी आता अविभाज्य घटक बनला आहे.

अंगणवाड्यांच्या कामात गती आणि पारदर्शकता यावी, या हेतूने दोन वर्षांपूर्वी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांना मोफत मोबाईल दिले. दरवर्षाला १६०० रुपयांची रक्कम इंटरनेटसाठी डाटा पॅक मारण्यासाठीही आगाऊ खात्यावर जमा करण्याची तरतूद केली.

अंगणवाडी सेविकांना रोजच्या रोज २५ प्रकारची रजिस्टर भरावी लागतात. ती हातानेच भरली जात होती. आता हे सर्व काम मोबाईलवर होत आहे. रजिस्टरवर नाेंदीसाठी जितका वेळ लागत होता, त्यापेक्षा कमी वेळ मोबाईलवर माहिती भरताना लागतो. शिवाय जेव्हा गरज वाटेल तेव्हा एका क्लिकवर ही माहिती उपलब्ध होत असल्याने अंगणवाडी ताईंचे काम सोपे झाले आहे.

लॉकडाऊन काळात तर मोबाईलच्या या उपक्रमाची खूपच मदत झाली. एकट्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ३ हजार ९९४ अंगणवाड्या व्हॉटस‌्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र जोडल्या. त्यातही अंगणवाडी सेविका, स्तनदा माता, गरोदर माता, बालकांचे पालक असे वेगवेगळे दहा हजार ग्रुप तयार केले. या माध्यमातून आकार अभ्यासक्रमासह प्रबोधनही केले. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे गेली दहा महिने अंगणवाड्या बंद असल्या, तरी शिक्षण सुरूच राहिले आहे.

१) पॉईंटर्स

जिल्ह्यातील अंगणवाडी - ३९९४

अंगणवाडी सेविका - ३९९४

मोबाईल वाटप - ३९९४

२) मोबाईलवरून ही कामे करावी लागतात

अंगणवाडीत येणाऱ्या बालकांची हजेरी, वजन, उंची, पोषण, आहार यांच्या नोंदी ठेवणे, गरोदर, स्तनदा महिलांना आहार व औषधासह आरोग्याचे मार्गदर्शन, गृहभेटीद्वारे व्हिडीओ दाखवून प्रबोधन करणे.

३) अडचणी काय?

बालकांना शिकविण्यापासून ते त्यांना आहार देणे, किशोरी, गराेदर, स्तनदा माता यांच्या सर्व नोंदी मोबाईलवरच कराव्या लागत असल्याने बऱ्याचवेळेला मोबाईल हॅंग होण्याचे, बंद होण्याचेही प्रकार घडतात. कधी नेटवर्कचा हा प्रश्न येतो. सर्वात महत्त्वाची अडचण आहे, ती ज्येष्ठ सेविकांची. त्यांना मोबाईल हाताळणे अवघड जात असल्याने त्यांना इतरांच्या मदतीवर विसंबून रहावे लागते. याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो, असे निरीक्षण सेविका असलेल्या आशा पाटील यांनी नाेंदवले.

४) महिला व बालकल्याण विभाग अधिकारी कोट

मोबाईलद्वारे अंगणवाडीचे सर्व कामकाज चालविण्याचा सर्वात चांगला प्रतिसाद कोल्हापुरातून मिळत आहे. मोबाईल बंद पडला, हरवला, तर पर्यायी मोबाईलची उपलब्धता करून देण्यासाठी स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. या व्यवस्थेमुळे कामे जलद होत आहेत.

सोमनाथ रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Complaints, still Anganwadi mothers use mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.