कोल्हापूर : कळंबा कारागृहाला लागून असलेच्या जागेवर सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असून ते आपल्या हद्दीत असल्याने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कळंबा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ही जागा कारागृह प्रशासनाची नव्हे, तर शिक्षण संस्थेच्या मालकीची असल्याने त्यांच्या परवानगीने तात्पुरता वापर करत असल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.
कारागृह अधीक्षकांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार कळंबा कारागृहाच्या परिसरात ५० एकर शासकीय जागा आहे. यातील काही जागा क्रीडा संकुलाला दिली आहे. उर्वरित जागा कारागृहाच्या मालकीची आहे. तेथे आता व्हाईट आर्मीकडून सिमेंट-विटाचे पक्के बांधकाम केले जात आहे. तेथे इतर झोपडपट्टीधारकांनीही अतिक्रमण केले आहे. दोन मजली आरसीसी इमारत उभी करून येथे गारमेंट सुरू केले जात आहे. ही जागा कळंबा कारागृह प्रशासनाची असताना अशाप्रकारे बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधकाम होत असल्याने कारवाई करावी, असे कारागृह अधीक्षकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, याबाबत व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे म्हणाले, ही जागा देसाई शिक्षण प्रसारक मंडळाची आहे, ती सरकारची नाही. व्हाईट आर्मीच्यादेखील ती नावावर नाही, ती आम्ही अन्नछत्रासाठी म्हणून तात्पुरती वापरास घेतली आहे.