सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या प्रतिदिन ७ हजार ५०० मेट्रिक टन गाळपाचा विस्तारीकरण कामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी मायादेवी पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून झाला.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची उभारणी १९६३ साली झाली. तत्कालीन तंत्रज्ञानानुसार टप्प्याटप्प्याने गाळप क्षमता वाढ करण्यात आली. सध्या प्रतिदिन चार हजार पाचशे मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवत कारखान्याची उभारणी करण्यात आली. मात्र, दिवसेंदिवस कारखाना कार्यक्षेत्रात चार तालुक्यांतील २१८ गावांत मुबलक पाण्यामुळे ऊस क्षेत्र वाढत गेले. त्यामुळे अधिक गाळपाची यंत्रणा कार्यरत करणे काळाची गरज बनली. यानुसार प्रतिदिन ७ हजार ५०० मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवून कारखान्याचा विस्तार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार या प्रकल्पासाठी लागणाऱ्या शासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, कामाच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. येत्या महिनाभरात सर्व मशिनरी कारखाना कार्यस्थळी पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पास १०० कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर व सहभाग अंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थसाहाय्य करणार आहेत. या नवीन प्रकल्पातून १० मेगावॅट जादा वीजनिर्मिती होणार आहे. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, धोंडिराम मगदूम, धनाजीराव देसाई, के. ना. पाटील, श्रीपती पाटील, जगदीश पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, नीताराणी सूर्यवंशी, अर्चना पाटील, भीमराव किल्लेदार, शिवाजी केसरकर, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.
फोटो
बिद्री (ता. कागल) येथे श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण कामाचा प्रारंभ करताना कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, त्यांच्या पत्नी मायादेवी पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई व संचालक मंडळ.