कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच कोल्हापुरात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:58+5:302021-04-07T04:26:58+5:30

कोल्हापूर : कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने परगावहून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर ...

Come to Kolhapur only if you have a Corona Negative Certificate | कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच कोल्हापुरात या

कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच कोल्हापुरात या

Next

कोल्हापूर : कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने परगावहून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर अथवा ॲन्टीजन टेस्ट नकारात्मक असल्याचे ४८ तासांच्या आतील प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश काढला आहे.

जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये १५ टक्क्यांहून अधिक संख्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आहे. यात मुंबई, पुणे, सांगली, सातारा येथील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने लोकप्रतिनिधींनी परगावहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली होती. त्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला.

त्यानुसार जिल्ह्यात तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी येणाऱ्या किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या व्यक्तींनी जिल्ह्यात किंवा गावात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासात आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजन चाचणी केल्याचे व तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र नसल्यास प्रभाग समिती, ग्राम समिती किंवा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून या व्यक्तींना प्रवेश नाकारला जाईल.

एका गावांतून दुसऱ्या गावांत जाण्यावरही निर्बंध..

जिल्ह्यांतर्गत एका गावातून किंवा दुसऱ्या गावात जाण्यासाठीदेखीलसुद्धा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देणे, गृह-ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे याबाबत ग्राम समिती व प्रभाग समितीचा निर्णय अंतिम असेल. गावागावांच्या वेशीवर त्यावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

--

प्रमाणपत्र नसल्यास स्वॅब द्या

प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तींनी तालुक्यातील शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत आधी स्वॅब देणे बंधनकारक आहे. तपासणी अहवाल नकारात्मक येईपर्यंत या नागरिकांना सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहावे लागेल. तपासणी न करता परस्पर घरी गेल्यास सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात राहावे लागेल. तीन दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील चार दिवसांच्या अलगीकरणातून सुट मिळेल.

--

लसीकरण झालेल्यांना सूट

कोल्हापुरात येणाऱ्या व्यक्तीने लसीकरणाचे दोनही डोस घेतले असतील व ज्यांना कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना ग्राम समिती व प्रभाग समितीच्या खात्रीनंतर अलगीकरणात राहणे बंधनकारक असणार नाही.

--

त्रास होणार, पण...

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत; परंतु त्याचा फटका नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने रोज शेजारच्या गावांत, तालुक्यात व जिल्ह्यांत जाणाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे हा आदेश लागू होताच, लोकांतून त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली.

Web Title: Come to Kolhapur only if you have a Corona Negative Certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.