आजरा : आजरा तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी टप्प्याटप्प्याने घेणे आणि शासन निर्णयानुसार २५ टक्के फी कमी करण्याबाबतचा निर्णय आजरा तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अध्यक्षस्थानी तहसीलदार विकास अहिर होते.
कोरोना व अतिवृष्टीचे संकट असताना तालुक्यातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी वसूल केली जात आहे. त्यामध्ये सवलत मिळून सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आजरा युवा सेनेच्या वतीने तहसीलदार विकास अहिर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी तहसील कार्यालयात बैठक झाली. बैठकीत उपस्थित प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फी शिवाजी विद्यापीठाकडे जमा करावी लागते. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठालाही फी माफीसंदर्भात विनंती करावी, असे सांगितले. यावेळी चर्चेत महाविद्यालयाचे प्राचार्य, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी.डी. वाघ, गटशिक्षणाधिकारी गुरव, नायब तहसीलदार डी.डी. कोळी, संभाजी पाटील, राजेंद्र सावंत, युवराज पोवार, ओमकार माद्याळकर, महेश पाटील, सुधीर सुपल, अनिकेत पाटील उपस्थित होते.