कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे शहरासह जिल्ह्यात लाॅकडाऊनचे कडक निर्बंध आहेत. तरीसुद्धा अनेक नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने शहरातील सिग्नल यंत्रणा शुक्रवारी सुरू केली होती. त्यामुळे कोंडी टाळण्यास मदत झाली.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, त्यास नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. शुक्रवारी दिवसभर कडक निर्बंध असूनही अनेक नागरिक रस्त्यावर वाहने घेऊन फिरत होती. त्यामुळे शहरातील उमा टाॅकीज, पार्वती टाॅकीज, दाभोळकर काॅर्नर, फोर्ड काॅर्नर आदी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी गर्दी पाहून कर्मचाऱ्यांना सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे वाहतूक कोंडीवर काहीअंशी नियंत्रण मिळविता आले.