कोल्हापूर : गणेशोत्सव सुरू होऊन आता चार दिवस झाले आहेत, त्यामुळे घरगुती गौरी-गणपतीच्या विसर्जन दिवसापासूनच देखावे खुले करण्याच्या उद्देशाने रात्रीचा दिवस करणाऱ्या मंडळांची देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर शहरातील पुरातन गणेश मंदिरांसह कोल्हापुरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीपुढे सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र, मान्यवरांच्या हस्ते किंवा सामूहिक आरती, सत्यनारायण पूजा अशा धार्मिक कार्यक्रमांमुळेअवघे शहर गणरायाच्या भक्तीत रंगले आहे. उद्या गौराईचे आगमन, बुधवारी गौरी पूजन होऊन गुरुवारी (दि.४) घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन होईल. यंदा घरगुती गणपती बाप्पा आणि गौराईचा मुक्काम वाढल्याने या सात दिवसांनंतरच मंडळांचे देखावे सुरू होतील. देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठेसह विविध मंडळांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील मानाचा असलेला श्री महालक्ष्मी मंदिरातील गणपती, संभाजीनगर तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, शिवाजी चौक तरुण मंडळ. या मंडळांच्या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. नारळांच्या तोरणाच्या राशीच येथे लागल्या आहेत. सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गणपती स्तोत्र पठण अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान काही मंदिरांमध्ये पूजा, प्रसादाचे वाटप सुरू आहे. मंडळांच्यावतीने त्या-त्या भागातील महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर शहर गणेश भक्तीत दंग...
By admin | Updated: September 2, 2014 00:18 IST