सर्किट बेंच : चर्चा निष्फळ

By admin | Published: January 30, 2015 12:46 AM2015-01-30T00:46:37+5:302015-01-30T00:52:43+5:30

आता ‘ठरावा’चा खोडा : वकील आक्रमक; उद्या तीव्र आंदोलन करणार

Circuit Bench: Discussed Failure | सर्किट बेंच : चर्चा निष्फळ

सर्किट बेंच : चर्चा निष्फळ

Next

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच हवे असेल तर तसा राज्य शासनाकडून ठराव करून आणा, अशी सूचना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी आज, गुरुवारी झालेल्या बैठकीत केली; परंतु असा ठराव यापूर्वीच शासनाने केला असल्याने नव्याने ठराव करण्याची गरज नाही, असा पवित्रा खंडपीठ कृती समितीने घेतल्याने या प्रश्नावर मुंबईत आज झालेली बैठक निष्फळ ठरली. यानंतर सर्किट बेंच करतानाही कालहरण होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला. त्यानुसार शनिवारी (दि. ३१) कोल्हापुरातील टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अटकाव करण्यात येणार आहे.बैठकीतील चर्चेची माहिती कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी पत्रकारांना दिली. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, सातारा या सहा जिल्ह्यांसाठी प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी कोल्हापुरात गेल्या दशकाहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. आज मुंबईत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शहा यांच्या दालनात यासंबंधी बैठक झाली. बैठकीत शहा यांनी, कोल्हापूरला सर्किट बेंच हवे असेल तर तसा शासनाकडून ठराव आणावा व राज्य शासनाने पुन्हा कोणत्याही जिल्ह्यात खंडपीठासाठी ठराव करणार नाही, असे लेखी आणावे, अशी सूचना केली. त्यावर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी, सर्किट बेंचचा निर्णय आपल्या अखत्यारीत आहे. प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ करावे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचसाठी पायाभूत व मूलभूत सुविधा देऊ, असे लेखी पत्र शासनाच्यावतीने दिले आहे. हा प्रश्न आपल्या अखत्यारीत आहे. तो सोडविण्यासाठी तातडीने निर्णय व्हावा, अशी विनंती केली. परंतु न्यायाधीशांकडून त्यासंबंधी सकारात्मक आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (दि. ३१) न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळ अटकाव करण्याचे ठरले. बैठकीला सचिव अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील (अरळगुंडीकर), अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. दीपक पाटील, अ‍ॅड. धैर्यशील पाटील (सातारा), अ‍ॅड. श्रीकांत जाधव (सांगली) आदी सहभागी झाले.


कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी कृती समितीची मागणी आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यासंबंधी ठोस आश्वासन न मिळाल्याने सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत आंदोलन केले जाईल.
- अ‍ॅड. विवेक घाटगे, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.

Web Title: Circuit Bench: Discussed Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.