कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) व पत्नी उमा यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आणि त्यातील मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता शासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हलवील, असा इशारा मंगळवारी निघालेल्या निषेध मोर्चात देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बहुतांश वक्त्यांनी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडत कडव्या शब्दांत निषेध नोंदविला. हल्ल्याचा निषेध आणि हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी बारा वाजता उत्स्फूर्तपणे कष्टकरी, श्रमिक, फेरीवाले यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने बिंदू चौकात एकत्र आले. ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. आम्ही सारे पानसरे; रक्त हिरवं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं; पुरोगामित्वाचे आम्ही वारकरी; कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध असो; लढेंगे, जितेंगे, आदी आशयाचे फलक हातात घेऊन लक्ष वेधण्यात आले. गोडसेवाद, सावरकरवाद मुर्दाबाद, भगव्याचे राजकारण करणाऱ्यांचा मुर्दाबाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना (आर.एस.एस), पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्याचा आणि झाडायला लावणाऱ्यांचा मुर्दाबाद, माणसा, माणसा जागा हो - विवेकाचा धागा हो अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासबाग मैदान, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, उषा टॉकीज, बसंत-बहार या मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ज्येष्ठ सामाजिक नेते एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो म्हणाले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे मारेकरी सापडलेले नाहीत. भाजपचे सरकार ठेकेदारी आणि लूटमारीला प्रोत्साहन देत आहे. प्रा. पाटील म्हणाले, डॉ. दाभोळकरांचे मारेकरी दीड वर्षानंतरही सापडत नाहीत. यामुळेच पुरोगामी लोकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढते आहे. राज्यकर्त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही. ते भेकड प्रवृत्तीने आपली खुर्ची सांभाळण्यात मश्गुल आहेत. पानसरे अजातशत्रू आहेत. त्यांचे कोणाशीही वैर नाही. त्यांचे विचार न पचणाऱ्या प्रवृत्तीने डाव साधला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला दाभोळकर, तानाजी ठोंबरे, उदय नारकर, गिरीश फोंडे, अॅड. सुभाष लांडे (अहमदनगर) यांची भाषणे झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजीव आवळे, ‘संग्राम’ संस्थेच्या सचिव मीना शेषू, धनाजी गुरव, साहित्यिक राजन गवस, अतुल दिघे, चंद्रकांत जाधव, नामदेव गावडे, गणी आजरेकर, शिवाजीराव परुळेकर, आदी उपस्थित होते. अनेक व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, कांगो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जाणीवपूर्वक अफवा पानसरेंवर कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. हे खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नये. यात पानसरे यांचे विचार न पचणाऱ्या शक्तीचा हात आहे, असे कांगो यांनी सांगितले. ‘आरएसएस’ची खुमखुमी ‘भाकप’चे नगरसेवक आशपाक सलामी (औरंगाबाद) म्हणाले, भाजप जातिपातींमध्ये भांडण लावीत राजकारण करीत आहे. भाजपचे सरकार आल्याने ‘आरएसएस’ वाल्यांना चेव चढला आहे.
मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हालविणार
By admin | Updated: February 18, 2015 01:29 IST