कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदीपात्र फेसाने व्यापले आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडल्याने नदीकाठावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याने पंधरा दिवसांपूर्वी शहरातील मैलायुक्त सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने नदी दूषित झाली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती; मात्र अवघे पंधरा दिवस उलटले असतानाच, पुन्हा नदीपात्रात दूषित पाणी आल्याने पंचगंगा काठचे नागरिक व शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तेरवाड बंधाऱ्यापासून इचलकरंजीपर्यंत नदीपात्र जलपर्णीने व्यापला आहे. त्यामुळे या पात्रातील पाणी दिसत नसले, तरी उग्र वास येत आहे. तर बंधाऱ्यापासून उत्तरेकडे पाण्याचे खरे रूप दिसत असून, पाण्यावर नजर पोहोचेपर्यंत रसायनयुक्त पाण्यामुळे फेस तयार होत आहे. बर्फासारखे गोळे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.
वारंवार प्रदूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी पिण्यासाठी नसले, तरी शेतीसाठी पाण्याचा वापर करत आहेत. मात्र, रसायनयुक्त पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे. शिवाय शेतात पाठविण्यासाठी पाण्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचेच्या रोगाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो - १३०४२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - रसायनयुक्त साडपाण्यामुळे पंचगंगा नदीपात्र फेसाने व्यापले आहे.