राधानगरी : शिक्षण संस्थेत विविध पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी) व परिसरातील सातजणांनी राधानगरी पोलिसांत दिली आहे. गोपाळ महादेव पाटील, मानसिंग गोपाळ पाटील, दत्तात्रय तुकाराम कांबळे (सर्व रा. बाचणी, ता. करवीर) व रमेश व्यंकटराव कांबळे (रा. पाचगाव, ता. करवीर) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. भाऊ नाना कांबळे, सुषमा मिलिंद वरुड, सखाराम दिनकर पाटील, जयराम पांडुरंग पाटील, वासंती कृष्णा कांबळे, लहू यशवंत टिंगे (सर्व रा. कोनोली तर्फ असंडोली, ता. राधानगरी) व शरद विष्णू कांबळे (रा. धुंदवडे, ता. गगनबावडा) यांनी ही तक्रार दिली. तक्रारीत वरील संशयितांची ग्रामीण आरोग्य व शैक्षणिक संस्था सुर्वेनगर कोल्हापूर अशी संस्था असून, या संस्थेमार्फत कोनोली येथे पहिली ते सातवीपर्यंतची निवासी आश्रमशाळा सुरू आहे. सन २००७ ते २०१० या काळात त्यांनी तक्रारदारांना या ठिकाणी स्वयंपाकी शिक्षक, लेखनिक अशा पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ ते ३० हजार रुपये अशी एकूण दोन लाख ८२ हजार रक्कम उकळली, मात्र नोकरी दिली नाही.याबाबत वारंवार विचारणा केल्यावर काहींना धनादेश दिले; पण ते वटले नाहीत. तसेच २६ जुलै २०१४ रोजी काहींच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनुसार या सर्वांचे पैसे ५ आॅगस्ट २०१४ रोजी परत देतो, असे प्रत्येकाला स्वतंत्रपणे १०० रुपयांच्या मुद्रांकावर लिहून दिले. मात्र, या मुदतीनुसार पैसे मागितल्यानुसार दमदाटी व धमकी देऊन उडवाउडवीची उत्तरे दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, तक्रारीनुसार संशयितांविरोधात राधानगरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, तपास सुरू आहे.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक
By admin | Updated: September 2, 2014 00:09 IST