मार्च ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्या. त्यांचा निकाल १८ जानेवारीला जाहीर झाला, पण सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे २७ जानेवारीला जाहीर करण्यात आले. या जाहीर झालेल्या आरक्षणात भामटे, खाटांगळे, उपवडे, घानवडे, वडकशिवाले येथे अनुसूचित जाती स्त्री आरक्षण आले, तर खेबवडे येथे अनुसूचित जमाती आरक्षण पडले. मात्र, या सात ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील सदस्यांचा अभाव असल्याने सरपंच निवडीच्या पहिल्या सभेत या गावांच्या सरपंचपद निवडी रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. फक्त उपसरपंच निवडी पार पडल्या. सरपंच पद रिक्त असल्याने आरक्षणात बदल करण्याचा अधिकार तहसीलदारांचा नसल्याने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षणाअभावी सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीचे फेरआरक्षण काढण्याचा आदेश १ मार्चला काढला होता. यात उपवडे, भामटे, खाटांगळे, घानवडे, वडकशिवाले तसेच खेबवडे येथील सरपंच पदाचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि. ५ मार्च) पूर्ण झाली. यात उपवडे, भामटे, खाटांगळे, घानवडे, वडकशिवाले या गावात अनुसूचित जाती स्त्री आरक्षण होते. या ठिकाणी असलेले स्री आरक्षण रद्द करून फेरआरक्षणात अनुसूचित जाती असा बदल झाला आहे, तर गाडेगोंडवाडी ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती स्री ऐवजी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री आरक्षण आले आहे.
खेबवडे येथे अनुसूचित जमाती असलेल्या आरक्षण बदलासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गमधून चिठ्ठीने आरक्षण काढण्यात आले.